कोरोना बाधित महिलेवर उपचार
बीड । वार्ताहर
औरंगाबादमध्ये कोरोना बाधित निष्पन्न झालेल्या बीडमधील एका महिलेवर त्यापूर्वी बीडच्या जालना रोडवरील एका हॉस्पीटलमध्ये उपचार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता बीड आरोग्य विभागाने हे हॉस्पीटल पुढील 24 तासांसाठी पुर्णत बंद करण्यात आले असून या दरम्यान या हॉस्पीटलमध्ये किती जण आले होते याची माहिती आरोग्य विभागाकडून संकलित केली जात आहे.
बीड शहरातील ब्राह्मणवाडीतील एका महिलेला न्यूमोनिया झाला होता. त्यादरम्यान तिचा स्वॅब घेण्यात आला होता, पण तो निगेटिव्ह आला होता. नंतर संबंधित महिलेवर बीडच्या जालना रोडवरील एका हॉस्पीटलमध्ये उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी औरंगाबादच्या रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे महिलेचा स्वॅब रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. ही माहिती बीड जिल्हा आरोग्य विभागाला देण्यात आल्यानंतर आज शुक्रवारी दुपारी जालना रोडवरील ते हॉस्पीटल पुढील 24 तासांसाठी बंद करण्यात आले आहे. हॉस्पीटलमध्ये सॅनिटायझर केले जाणार असून संबंधित महिला तिथे उपचारासाठी असताना किती रुग्ण तिथे आले होते, त्यांची माहिती आरोग्य विभागाकडून संकलीत करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
Leave a comment