बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्याला मागील तीन दिवसांपासून मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने उपाययोजना केल्या जात आहेत. आज गुरुवारी (दि.25) सकाळी जिल्ह्यातून तपासणीसाठी पाठवलेले सर्व 11 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. असे असले तरी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाने तोंडाला मास्क बांधतानाच सामाजिक अंतर राखण्याची गरज आहे.
बीड जिल्ह्यातून गुरुवारी सकाळी अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेत अकरा व्यक्तींचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्याचे अहवाल दुपारी जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाले.हे सर्व अकरा अहवाल निगेटिव्ह आले आहेत दरम्यान मागील तीन दिवसांपासून पाठवलेले सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
यापुर्वी मंगळवारी तपासणीला पाठवलेले सर्व 17 अहवाल निगेटिव्ह आले होते.त्यानंतर बुधवारी तपासलेले 65 पैकी 63 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले तर उर्वरित 2 अहवाल रिजेक्ट केले गेले. त्यापूर्वी चार दिवसात बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने चिंतेचे वातावरण होते. मात्र नंतर आता तीन दिवसात एकही बाधीत रुग्ण निष्पन्न झालेला नाही.
दरम्यान आजपर्यंत बीड जिल्ह्यात एकूण 116 कोरोना बाधीत रुग्ण निष्पन्न झाले. यातील 4 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला तर 86 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला असून आता 26 जणांवर उपचार सुरू आहेत असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
Leave a comment