आढावा बैठकीत कृषीसह बँक अधिकारी
डीडीआर यांनाही सुनावले खडेबोल
शेतकर्यांच्या भल्यासाठी चौकटीबाहेर
जावून प्रामाणिकतेने काम करा
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात न उगवलेल्या बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणी चौकशी केली जाईल, बियाणे का उगवले नाहीत याची जबाबदारी संबंधित बियाणे पुरवठादाराची राहिल, तसे आदेश कृषी विभागाला दिले असून दोषींवर चौकशीअंती कारवाई केली जाईल असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सोमवारी (दि.22) बीडमध्ये दिले. कृषी विभागाने शेतकर्यांची संवाद ठेवावा, त्यांना कोणतीही अडचण न येवू देता मुबलक प्रमाणात खते आणि बी-बीयाणे मिळावेत यासाठी अधिकार्यांनी चौकटीबाहेर जावून काम करावे असे आवाहनही त्यांनी केले. आढावा बैठकीत कृषीमंत्र्यांनी कृषी विभागासह बँक अधिकारी आणि जिल्हा उपनिबंधकांनाही तातडीने कामांचा निपटारा करा असे सांगत खडेबोल सुनावले.
यंदा खरिपात सोयाबीनची पेरणी केलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकर्यांना बियाणे कंपन्या आणि त्यांच्या जिल्ह्यातील वितरकांनी चक्क बोगस अन् निकृष्ट बियाणे विकले मात्र पेरलेलं सोयाबीन उगवलंच नाही, त्यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकर्यांनी पेरलेले सोयाबीन उगवले नाही, त्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. जिल्हा कृषी विभागाच्या हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी शेतकर्यांना तक्रारी नोंदवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान रविवारी रात्रीच कृषी मंत्री दादाजी भुसे हे बीडमध्ये दाखल झाले. सोमवारी (दि.22) सकाळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाची आढावा बैठक घेतली. याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अजित कुंभार, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, जिल्हा सहकारी निबंधक शिवाजी बडे, कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्प संचालक दत्तात्रय मुळे,उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील,कृषी विभागाचे विष्णू मिसाळ यासह कुंडलिक खांडे ,सचिन मुळीक , विविध बँक अधिकारी, सहकार व कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी बीड जिल्ह्यात आजपर्यंत झालेल्या कर्जमाफी योजनेचा आढावा घेतला. कर्जमाफीची प्रक्रिया संथ गतीने असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी बँकाचे अधिकारी तसेच जिल्हा निंबधक यांना कामाची गती वाढवण्याचे सूचना करतानाच नाराजी व्यक्त केली. शेतकर्यांना पीक कर्ज वेळेवर वाटप करावे. खते, बी-बीयाणे वाटप करताना कोणत्याही शेतकर्यावर अन्याय होणार नाही याची खबरदारी कृषी अधिकार्यांनी घ्यावी अशा सूचना दिल्या.
बीड जिल्ह्यात पेरणी करुनही न उगवलेल्या सोयाबीनचा मुद्दा बैठकीत उपस्थित झाला. कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याचे मान्य करत कृषी विभागाच्या अधिकार्यांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करावी असे आदेश त्यांनी दिले. तसेच जिल्ह्यात बोगस अन् निकृष्ट सोयाबीनचे बीयाणे विक्री होईपर्यंत कृषी विभागाच्या ते लक्षात का आले नाही? वितरकांनी शेतकर्यांना निकृष्ट बीयाणे कसे विकले, वितरकांपर्यंत ते बीयाणे पोहचवणार्या कंपन्या कोणत्या? या सार्यांचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. सोयाबीन न उगवल्याने शेतकर्यांवार दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून राज्य शासन याबाबत तातडीने योग्य तो निर्णय घेवून शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घेईल असे आश्वासनही कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. याप्रसंगी कृषी मंत्री यांनी जिल्ह्यातील खरीप पीक पेरणी क्षेत्राची माहिती घेऊन बियाणे मागणी व पुरवठा रासायनिक खतांचे नियोजन थेट बांधावर खत पुरवठा तालुकानिहाय कृषी निविष्ठा केंद्रांची संख्या भरारी पथकांची स्थापना या अनुषंगाने झालेली कार्यवाही तसेच पीक कर्ज वाटप व या विविध बाबींचा आढावा घेतला.
बँक अधिकार्यांना सुनावले खडेबोल
कर्जमाफी योजनेतून एसबीआयला 50 टक्के म्हणजेच 424 कोटी रुपये मिळाले. मात्र त्याचे वाटप होत नसेल तर ही गंभीर बाब आहे, या आठवड्यात जर निर्णय झाला नाही तर याबाबत आपण वरिष्ठ पातळीवर तक्रार करु असा इशाराही कृषी मंत्री भुसे यांनी आढावा बैठकीत बँक अधिकार्यांना दिला.
अहवाल मागवला
बोगस बियाणे प्रकरणी कृषी शास्त्रज्ञ व तालुकास्तरीय समित्यांनी पाहणी प्राथमिक अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश देतानाच कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी जिल्ह्यात खतांची साठेबाजी करणार्या कृषी दुकानांविरोधात कठोर कारवाई करण्याच्याही सूचना त्यांनी केल्या.
अडचणी तातडीने सोडवू-जिल्हाधिकारी
यावेळी जिल्ह्यातील पिक कर्ज वाटपाची स्थिती पंधरा दिवसात सुधारण्यात येईल असे सांगून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बी बियाणे व खत बाबत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाईल यासाठी संबंधित विभाग तत्परतेने कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. सध्या जिल्ह्यात एकूण 5 लक्ष 21 हजार 846 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून हे प्रमाण 71.73 टक्के आहे यामध्ये सोयाबीन 1 लाख 73 हजार 227 कापूस 2 लाख 58 हजार 316 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेले आहे असे सांगीतले.
यंत्रणेला या दिल्या सूचना
-कृषी विक्रेत्यांकडे बियाणे अन् खतांचा साठा
व दर असलेले फलक दुकानाबाहेर दर्शनी भागात लावा.
-बोगस बियाणे प्रकरणी अहवाल द्या
-पीक विमा कंपनीची नियुक्ती करा
-शेतकर्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करून द्या.
-बीड जिल्ह्यात अनेक शेतकर्यांचे बियाणे
उगवले नसल्याच्या तक्रारी गंभीर
-नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश
शेतकर्यांची तक्रार येत असेल तर संबंधितांवर तातडीने कारवाई करा.
-कृषी विभागाकडून आजपासून पंचनामे सुरु होणार
Leave a comment