तक्रारीनंतर कृषी अधिकारी दाखवू लागले शहाणपणा
बीड । वार्ताहर
आधीच कोरोनाचे संकट त्यातही जिल्ह्यातील शेतकर्यांनी मोठ्या मेहनतीने काळ्या आईची ओटी भरली. मात्र यंदा खरिपात सोयाबीनची पेरणी केलेल्या शेतकर्यांना बियाणे कंपन्या आणि त्यांच्या जिल्ह्यातील वितरकांनी चक्क बोगस अन् निकृष्ट बियाणे विकून आपले खिसे भरले. मात्र पेरलेलं सोयाबीन उगवलंच नाही, त्यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना डोक्यावर हात ठेवून हतबल होवून बसण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकर्यांनी याबाबत कृषी विभागाकडे तक्रारी करत बोगस बियाणे विक्री करणार्या वितरकांसह कंपन्यावर कारवाईची मागणी केली आहे. शेतकर्यांवर यंदा ही विचित्र स्थिती ओढवलेली असताना दुसरीकडे जिल्ह्याचा कृषी विभाग मात्र सोयाबीनचे बोगस बियाणे खासगी कंपन्या अन् त्यांचे वितरक विकून मोकळे होईपर्यंत ते बियाणे खरच उगवणक्षम आणि दर्जेदार आहेत का? याची खातरजमाही करु शकले नाही अन् आता शेतकर्यांचे सोयाबीन पेरून दहा-बारा दिवस झाल्यानंतर ते उगवलेच नसल्याचे शेतकर्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर तालुका कृषी अधिकार्यांकडे तक्रारी नोंदवण्याचे आवाहन करत आहे. त्यामुळे इतके दिवस कृषी विभाग नेमका काय करत होता? असा संतप्त सवाल जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत.
बीड जिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगामात कपाशीपाठोपाठ सोयाबीन आणि तूरीचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. यंदा मात्र नवीन समस्या निर्माण झाली आहे. कोरोना महामारीचा फायदा घेत काही बोगस बियाणे कंपणीने आपले बियाणे बाजारात उतरविले आहे. परंतु या बोगस बियाण्यांमुळे शेतकरी मात्र पुरता अडचणीत आला आहे. मृग नक्षत्रात शेतात सोयाबीन पेरणी केल्यानंतर यंदा पावसानेही शेतकर्याला चांगली साथ दिली. पेरणीयोग्य पाऊस झाला. असे असले तरी पेरणी करुन दहा ते बारा दिवस झाल्यानंतरही बियाणे उगवले नसल्याने शेतकरी नव्या संकटात सापडला आहे. खासगी कंपन्यांनी जिल्ह्यातील वितरकांमार्फत बोगस बियाणेच शेतकर्यांना विकल्याचा गंभीर प्रकार या निमित्ताने समोर येवू लागला आहे. जिल्ह्यात 20 जूनपर्यंत खरीपाच्या जवळपास 20 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी सोयाबीनमधून उत्पादन घेतात. यंदाही शेतकर्यांनी जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी केली; परंतु पेरणीनंतर आठवडा लोटल्यानंतरही हे सोयाबीन उगवलेच नाही. त्यानंतरही शेतकर्यांनी दोन-तीन दिवस वाट पाहिली मात्र परिस्थिती जैसे थे असल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकर्यांनी याबाबत कृषी विभागाला कळवले. त्यानंतर कृषी विभागाला याबाबत माहिती मिळाली आहे.
याबाबत कृषी विभागाने शनिवारी एक पत्रक प्रसिध्दीस दिले असून त्यात म्हटले आहे की, जिल्ह्यात या वर्षी वेळेवर पाऊस झाल्याने शेतकर्यांची मागील 8 ते 10 दिवसापासून खरिपाच्या पेरणीची लगबग सुरु झाली असून सोयाबीन पिकाची पेरणीही या वर्षी मोठ्या प्रमाणात सुरु असून बियाणे उगवत नसल्याच्या अनेक तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या असून शेतकर्यांनी आपल्या तक्रारी तालुका कृषी अधिकार्यांकडे नोंदवाव्यात. कृषी विभागाने यासाठी तक्रार निवारण समित्याही गठीत केल्या आहेत असे यात सांगीतले आहे. शिवाय शेतकर्यांनी आपला तक्रार अर्ज आपल्या तालुक्याच्या तालुका कृषि अधिकारी किंवा पंचायत समितीचे कृषि अधिकारी यांचेकडे बियाणे खरेदीच्या पक्क्या पावतीसह सादर करावा. तालुका स्तरावर उपविभागीय कृषि अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आलेली असून या समितीमार्फत प्राप्त तक्रारींची रितसर चौकशी करण्यात येईल, तक्रारीचे अनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र निकम यांनी केले आहे.
दादा भुसेंचा औरंगाबादमध्ये दणका
अधिकार्याला रजेवर पाठवले; बीडमध्येही रात्री घेतली बैठक
शेतकर्यांना खते, बियाणे मिळताहेत की नाही हे पाहण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे रविवारी दुपारी स्वत: शेतकरी बनून औरंगाबाद येथील एका दुकानात गेले. खते शिल्लक असतानाही दुकानदाराने देण्यास नकार दिल्यानंतर कृषिमंत्र्यांनी जिल्हा कृषि अधीक्षकांमार्फत त्या दुकानाचा आणि गोदामाचा पंचनामा करत औरंगाबाद येथील कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण अधिकार्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. दरम्यान औरंगाबादमध्ये स्टिंग करुन कृषी मंत्री दादाजी भुसे रविवारी रात्री बीड मुक्कामी दाखल झाले असून आज सोमवारी सकाळी ते जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. तत्पूर्वी रात्री त्यांनी विश्रामगृहात अधिकार्यांची बैठकही घेतली आहे. बीड जिल्ह्यातही सोयाबीन उत्पादक शेतकर्यांचे बियाणे कंपन्या आणि वितरकांनी मोठे नुकसान केले असून शेतकर्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. कृषी विभागातील कामचूकारपणा करणार्या बीडमधील अधिकार्यांनाही खडे बोल सुनावण्याची गरज आहे.
बियाणे कंपन्यासह वितरकांवर गुन्हे दाखल करा
बीड जिल्ह्यात यापूर्वीही बोगस बियाणे अन् खताचा साठा कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून जप्त केला गेला आहे. यंदाच्या हंगामातही नुकतेच दहा विक्रेत्यांवर कारवाई झाली आहे. असे असले तरी सोयाबीनचे बोगस बियाणे जिल्ह्यात विकले गेले. यावेळी कृषी विभागाला माहिती का मिळू शकली नाही, भरारी पथकाने बोगस बियाणे विक्री करणार्या कंपन्या अन् वितरकांवर कारवाई का केली नाही.असा प्रश्न सोयाबीन उत्पादक शेतकर्यांतून विचारला जात असून अशा कपंन्या अन् वितरकांना पाठीशी घालणार्या कृषी अधिकार्यांना घरी पाठवा अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे.
दुबार पेरणीचा खर्च अधिकार्यांच्या पगारातून कपात करा
सोयाबीन न उगवल्यामुळे आता शेतकर्यांचा शेत मशागतीपासून ते सोयाबीन पेरणी अन् नंतर आता ते पीक न उगवल्याने पुन्हा दुबार पेरणी करण्याचा खर्च भरुन कोण देणार? असा सवाल शेतकर्यांतून प्रशासनाला विचारला जात आहे. कृषी विभागाने सोयाबीनचे बोगस बियाणे जिल्ह्यात येवू नयेत यासाठी काही ठोस उपाययोजना का केली नाही असा प्रश्नही शेतकरी विचारित आहेत. दरम्यान शेतकर्यांना सोयाबीन पेरणीचा आणि बियाणांचा झालेला खर्च अधिकार्यांच्या पगारातून कपात करावा अशी मागणीही होत आहे.
Leave a comment