शिस्त पाळा-अॅड.अजित देशमुख
बीड । वार्ताहर
कोरोना काळात बीड जिल्हा प्रशासन अतिशय दक्षपणे काम करत आहे. प्रशासनातील जिल्हाधिकार्यांपासून जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी हे तिघेही रात्री दोन दोन वाजेपर्यंत जागे असतात. एकीकडे प्रशासन दक्षतेने निर्णय घेत असताना दुसरीकडे विना मास्क करणारी जनता आणि कुठलेही नियम न पाळणारे लोक हे कोरोणाच्या बाबतीत घातक ठरू शकतात. लोकांचा निष्काळजीपणा थांबला नाही तर कोरोणाचा उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे जनतेने या बाबतीत दक्ष रहावे, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित देशमुख यांनी केले आहे.
बीड जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन जिवापाड प्रयत्न करत आहे. प्रयत्न करणारे अधिकारी आपण जवळून पाहिले आहेत. त्यामुळे यांना किती कष्ट घ्यावे लागले हे दिसले. जनतेलाही या बाबी मान्य आहेत. त्यामुळे प्रशासनावर जनता देखील खुश आहे.मात्र ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत, त्या ठिकाणी वाटेल तेवढी दक्षता घेतली जात नाही. त्याच प्रमाणे हे रुग्ण कोठे कोठे फिरले याची माहिती प्रशासनाला त्याच वेळ दिली नाही तर रुग्ण संख्या वाढू शकते. त्यामुळे ज्या व्यक्तीवर कोरोणाची आफत आलेली आहे, त्याने घाबरून न जाता समाज वाचविण्यासाठी पुढे येणे देखील आवश्यक आहे.एका व्यक्तीचा निष्काळजीपणा कोरोणाची साखळी पुढे नेण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी आपण देखील समाजाचा एक भाग आहोत, हे समजून पुढे येऊन सर्व माहिती प्रशासनाला वेळ दिली तर कोरोणाला रोखण्यात आपण यशस्वी होऊ.
जनतेने मास्कचा वापर केला पाहिजे. मात्र पन्नास टक्केच्या वर लोक मास्क वापरत नाहीत, हे रस्त्याने जाता येताना दिसते. हे देखील घातक आहे. त्यामुळे मास्क न वापरणारावर तात्काळ कार्यवाही होणे आवश्यक आहे.त्याप्रमाणे त्या ठिकाणी गर्दी होते, अशा ठिकाणच्या लोकांनी दक्षता घेऊन गर्दी जमा होणार नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. प्रशासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी योग्य प्रकारे होण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा. दररोज दोन, चार, पाच, दहाने वाढणारी संख्या साखळी तोडल्या शिवाय थांबणार नाही. त्यामुळे शिस्त पाळा, असे आवाहन अँड. देशमुख यांनी केली आहे.
Leave a comment