पाटोद्यातील 4 तर बीडमधील 1 बाधीत
जिल्ह्यात 23 रिपोर्ट निगेटिव्ह; 3 प्रलंबित
बीड | वार्ताहर
बीड जिल्हावासीयांची पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.आज रविवारी सकाळी तपासणीला पाठवलेल्या 31 पैकी 5 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. यातील 4 जण पाटोदा शहरातील माळी गल्लीतील रहिवासी आहेत. तर अन्य 1 बाधीत रुग्ण बीडच्या शहेनशहा नगरमधील आहे.पाचही बाधीत रुग्ण अंबाजोगाई येथील 15 जूनला आयोजित लग्नाहून परतल्यानंतर बाधीत झाल्याचे निष्पन्न झाले आहे. उर्वरित 23 अहवाल निगेटिव्ह तर 3 प्रलंबित असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
शनिवारी एकट्या बीड शहरात 7 तर धारूर तालुक्यात 2 कोरोना बाधीत रुग्ण निष्पन्न झाले होते, त्यानंतर जिल्ह्यात आता आणखी 5 रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी आता अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
बीड जिल्ह्यातून रविवारी (दि.21) 31 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.यात जिल्हा सामान्य रुग्णालय बीड 21, कोव्हीड केअर सेंटर बीड 3, आष्टी ग्रामीण रुग्णालय 1, गेवराई उप जिल्हा रुग्णालयातून 2 आणि अंबाजोगाईच्या स्वाराती ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयातून 4 व्यक्तींच्या स्वॅबचा समावेश होता.
यातील 5 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत तर उर्वरित 26 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पाटोदा शहरातील माळी गल्लीतील 11 वर्षीय मुलगी 30 वर्षीय स्त्री, 7 वर्षीय मुलगा व 33 वर्षीय पुरुषाचा तसेच बीड शहरातील शहेनशहा नगरमधील 25 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
तिघे कोरोनामुक्त; 28 जणांवर उपचार सुरू
दरम्यान रविवारी बीड तालुक्यातील 2 तर केज तालुक्यातील 1 असे 3 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली. बीड जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 112 कोरोना बाधीत रुग्ण निष्पन्न झाले.त्यातील 80 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.4 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर आता 28 रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.
Leave a comment