बीड । वार्ताहर
शहरातील गजबजलेल्या सहयोगनगर भागात दुचाकीवरुन आलेल्या दोन तोतया पोलीसांनी एका वृध्द दही विक्रेत्यास ‘आम्ही पोलीस आहोत’ सांगत वृध्दाच्या हातातील 17 हजारांची सोन्याची अंगठी हातोहात लंपास केली. ही घटना शनिवारी (दि.20) सकाळी पावणे नऊच्या सुमारास घडली. सकाळी घडलेल्या या घटनेने सहयोगनगरमध्ये खळबळ उडाली. शहर ठाण्यापासून जवळच्या अंतरावर तोतयेगिरी करणार्या या भामट्यांना पकडण्याचे आता शहर पोलीसांसमोर आव्हान आहे.
नामदेव गणपती भंडाणे (60 रा, मांडवजाळी, ता.बीड) हे नागरिक शनिवारी सकाळी सहयोगनगर भागातील एका बँकेसमोरुन नेहमीप्रमाणे सकाळी दही विक्री करत जात होते. यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन दोन अनोळखी लोक त्यांच्यासमोर आले. त्यांनी भंडाणे यांना ‘आम्ही पोलीस आहोत’ अशी बतावणी करत तोतयेगिरी करत भंडाणे यांच्या हातातील सोन्याची दहा ग्रॅम वजनाची अंगठी काढून धूम ठोकली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे वृध्द दही विक्रेता घाबरुन गेला. नंतर त्यांनी शहर ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार कथन केला. दरम्यान शहर ठाण्यापासून जवळच ही घटना घडल्याने आता पोलीसांना या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान आहे. यापूर्वी दरोडा प्रतिबंधक पथकात प्रदिर्घ कामाचा अनुभव असलेले आणि आता शहर ठाण्याची जबाबदारी सांभाळणारे सहाय्यक निरीक्षक गजानन जाधव दही विक्रेत्याला लुटणार्या चोरट्यांना गजाआड करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Leave a comment