बीड । वार्ताहर
शहरातील शाहूनगर येथील प्राची डेंटल क्लिनीकच्या डॉ.सोनाली शहादेव जगताप या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परिक्षेत उत्तीर्ण झाल्या असून त्यांची उपशिक्षणाधिकारीपदी निवड झाली आहे. त्यांची निवड झाल्याचे कळताच शिक्षण क्षेत्रातील अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. कठोर मेहनत व अभ्यासाच्या बळावर भविष्यात वर्ग-१ चे पद मिळविण्याचे आपले स्वप्न असल्याचे डॉ.सोनाली जगताप यांनी बोलताना सांगितले.
डॉ.सोनाली जगताप यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बीड येथील चंपावती विद्यालयामध्ये तर उच्च माध्यमिक शिक्षण लातूर येथे राजर्षी शाहू महाविद्यालयात झाले आहे. सीईटीमध्ये चांगले गुण प्राप्त केल्यामुळे त्यांना शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे प्रवेश मिळाला. २००८ साली त्यांनी बी.डी.एस.ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर काही काळ बीड येथे दंत वैद्यकीय महाविद्यालयात नोकरी केली. डॉ.शहादेव जगताप यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांनी स्वत:च्या प्राची डेंटल क्लिनीकमध्ये वैद्यकीय सेवा केली. सतत वाचन, कठोर मेहनत व अविरत अभ्यासाच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत त्यांनी यश प्राप्त केले. पहिल्याच प्रयत्नात त्यांची राज्यसेवेच्या परिक्षेमधून २०१२ साली एसटीआयपदी निवड झाली. नोकरी करीत असताना त्यांनी आपल्या वाचनात व अभ्यासात खंड पडू दिला नाही. त्यामुळे २०१७ साली राज्यसेवेच्या परिक्षेतून सहाय्यक निबंधकपदी निवड झाली. तर २०२० मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहीर झालेल्या निवड यादीत त्यांची उपशिक्षणाधिकारीपदी निवड झाली. सतत तीन परिक्षेत त्यांनी हे यश कुठलाही खाजगी क्लास न लावता मिळवले आहे. या परिक्षेत डॉ.सोनाली जगताप यांना अगदी थोड्या गुणांच्या फरकाने वर्ग एक पदाने हुलकावणी दिली असली तरी कठोर मेहनत व अभ्यासाच्या बळावर भविष्यात वर्ग -१ चे पद मिळविण्याचे आपले स्वप्न असल्याचे डॉ.सोनाली जगताप यांनी सांगितले.
त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे भामेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक एल.आर.जाधव, डॉ.शहादेव जगताप, डॉ.प्रशांत जाधव, पत्रकार पोपट कोल्हे, विशाल पवार, भरत सवासे, सुशील ढेरे, छोटू बामदळे, जयराम जाधव, विकास बामदळे, शुभम काशीद, श्रीनिवास चौरे, विकास जाधव यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
Leave a comment