चार उपअधीक्षक, एक तहसीलदार, एक डेप्युटी सीईओ
कड्याचा सुपुत्र सामाजिक व आर्थिक मागास प्रवर्गातून अव्वल
बीड,आष्टी,अंबाजोगाई धारुर । वार्ताहर
बीडच्या सुपुत्रांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दैदिप्यमान कामगिरी करत स्पृहनिय यश संपादन करत राज्यात बीडचा झेंडा रोवला आहे. शुक्रवारी (दि.19) लोकसेवा आयोगाचा निकाल घोषित झाला. यात बीड जिल्ह्यातील चार विद्यार्थी पोलीस उपअधीक्षक झाले आहेत. याशिवाय एका विद्यार्थीनीने तहसीलदार तर एकाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी होण्याचा बहुमान मिळवला आहे. आष्टी तालुक्यातील कडा येथील रवींद्र भोसले यांनी सामाजिक व आर्थिक मागास प्रवर्गातून राज्यात प्रथमस्थान पटकावून बीडचे नाव कमावले आहे. महत्वाचे हे की,पात्र उमेदवारांमध्ये ते पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये असून त्यांनी नववे स्थान मिळवले आहे. याशिवाय अंबाजोगाईतील अंबिका सोसायटीतील राहिवासी योगेश राजीव सारणीकर यांची राज्य उत्पादन शुल्कच्या पोलीस उपअधीक्षकदी निवड झाली आहे.
कडा कारखान्याच्या कामगाराचे सुपुत्र रवींद्र भोसले उपअधीक्षक
आष्टी तालुक्यातील कडा साखर कारखान्यातील कामगार दिनकर भोसले यांचे पुत्र रवींद्र भोसले यांची पोलीस उपअधीक्षक पदावर निवड झाली. रवींद्र यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालयात झाले. दहावीला प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर लातूर येथे बारावीपर्यंत शिक्षण घेतले. बारावीतही ते गुणवत्ता यादीत आला होता. त्यानंतर रवींद्र यांनी पुणे येथे अभियांत्रिकीची पदवी घेऊन बडोदा येथे नोकरीही केली पण उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी दोन वर्षांतच त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन दिल्ली येथे यूपीएससीची तयारी केली त्या ठिकाणी अपयश आल्याने पुन्हा महाराष्ट्रात येऊन पुणे येथे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. दोनवेळा अपयश पदरात पडल्यानंतरही खचून न जाता तिसर्या प्रयत्नात त्यांनी यश मिळवले. त्यांची शुक्रवारी उपअधीक्षक म्हणून निवड झाली आहे.
लिपिक, व्यापार्याचे सुुपुत्र झाले उपअधीक्षक
धारुर तालुक्यातील खोडस येथील मूळ रहिवासी अजय विलास कोकाटे हे राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन उपअधीक्षक झाले आहेत. त्यांचा राज्यात तृतीय क्रमांक आला आहे. त्यांचे शिक्षण अंबाजोगाईच्या योगेश्वरी नूतन विद्यालयात झाले त्यानंतर लातूर व पुढे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण झाले. त्यांचे वडील विलास कोकाटे हे अंबाजोगाई न्यायालयात लिपिक आहेत. याशिवाय अंबाजोगाई येथील योगेश रांजणकर यांचीही उपअधीक्षकपदी निवड झाली असून त्यांच्या वडिल किराणा व्यापारी आहेत.दरम्यान अंबाजोगाईतील राहिवासी योगेश राजीव सारणीकर यांची राज्य उत्पादन शुल्कच्या पोलीस उपअधीक्षकदी निवड झाली आहे.
शिरुरच्या प्रियंका मिसाळ तहसीलदार
तर अभिजित पाखरे डेप्युटी सीईओ
शिरुर तालुक्यातील दोन उमेदवारांनी एमपीएससीमध्ये मोठे यश संपादन केले आहे. खोकरमोहा येथील डॉ. प्रियंका मिसाळ यांची तहसीलदारपदी तर पाडळी येथील अभिजित पाखरे उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड झाली आहे.खुल्या प्रवर्गातून प्रियंका मिसाळ या टॉप टेनमध्ये सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांचे नववीपर्यंतचे शिक्षण चंपावती विद्यालय, दहावी भगवान विद्यालय, तर उच्च माध्यमिक शिक्षण अहमदनगर जिल्ह्यात झाले. नंतर त्यांनी नागपूरमध्ये बीडीएसचे शिक्षण पूर्ण केले. पहिल्या प्रयत्नात मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली होती. जलसंपदा विभागात त्या कार्यरत होत्या. आता दुसर्या प्रयत्नात तहसीलदार म्हणून त्यांची निवड झाली आहे. त्यांचे वडील भास्कर मिसाळ हे मुख्याध्यापक आहेत.अभिजित पाखरे यांचे प्राथमिक शिक्षण पाडळी येथील शाळेत झाले असून त्यांनी पदवीचे शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात घेतले आहे. वडील गहिनीनाथ पाखरे हे खालापुरी येथील संस्थेवर शिक्षक असून आई मनीषा पाखरे या जि.प. शाळेत शिक्षिका आहेत. या दोघांच्या निवडीने तालुक्याची मान उंचावली आहे.
Leave a comment