बीड | वार्ताहर
बीड शहरातील एक पुरुष व एक महिला कोरोना बाधीत निष्पन्न झाले आहेत.शहरातील छोटीराज गल्ली, कारंजा रोड येथील 41 वर्षीय पुरुष व 33 वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.त्यामुळे आता या भागात आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. उर्वरित 74 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अजित कुंभार यांनी दिली.
कोरोनाच्या निश्चित निदानासाठी आज शुक्रवारी (दि.19) सकाळी बीड जिल्ह्यातील 76 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यात स्वाराती ग्रा. वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई 3, ग्रामीण रुग्णालय,आष्टी 2, केज उपजिल्हा रुग्णालयातून 30 आणि सर्वाधिक 41 स्वॅब बीडमधील होते, त्यातील बीडमधील 2 व्यक्तींचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.आता वैद्यकीय अधिकारी यांच्या निगराणीखाली या रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात 22 रुग्णांवर उपचार सुरू
जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत असून आजच्या दोघांसह जिल्ह्यात आतापर्यंत 97 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 72 जण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 3 जणांचा मृत्यू झाला आहे तर आता 22 रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.
अधिक्षकांसह 30 पोलिसांचे रिपोर्ट निगेटिव्ह
पोलीस कोविड-19 सुरक्षा सेलच्या माध्यमातून गत आठवड्यात पालकमंत्री धनंजय मुंडे व त्यांच्या खासगी कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या 26 पोलीस कर्मचारी व 4 पोलिस अधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांचे कोरोना विषाणू संसर्गाबाबत घेण्यात आलेल्या स्वॅबचे रिपोर्टही शुक्रवारी कोरोना निगेटिव्ह आले असल्याची माहिती बीड पोलीसचे जनसंपर्क अधिकारी विलास हजारे यांनी दिली.
Leave a comment