टॅब घेऊन दिला नाही म्हणून विद्यार्थ्याची आत्महत्या
धोंडराई | वार्ताहर
शिक्षणासाठी पालकांकडे टॅब (मोबाईल) घेण्याची मागणी केली. मात्र लगेच टॅब न घेऊन दिल्याने त्या विद्यार्थ्याने माळवादाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी (दि.18) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भोजगाव (ता.गेवराई) येथे ही घटना घडली.ऑनलाईन शिक्षणाचा जिल्हयात पहिला बळी गेल्याची पहिलीच घटना म्हणावी लागेल.
अभिषेक राजेद्र संत (१७) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. अभिषेकने दहावीची परीक्षा दिली होती.निकाल लागण्यासाठी काही कालावधी बाकी असताना इथुन पुढचे शिक्षण आता ऑानलाईन पद्धतीने होणार असल्याने आता आपल्याकडे टॅब (मोबाईल) नसल्याने त्याची मागणी त्याने आई-वडिलांकडे केली होती.थोडे दिवस थांब नंतर मोबाईल घेऊया सध्या पेरणीचे दिवस आहेत. बी-बीयाणे आणायचे आहेत. ते झाले की मोबाईल घेऊयात असे सांगितले होते. दरम्यान नंतर सर्वजण शेतात गेल्यावर अभिषेकने गुरुवारी दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. माहिती मिळाल्यानंतर गेवराई ठाण्याचे निरीक्षक पुरुषोत्तम चोबे, उपनिरीक्षक युवराज टाकसाळ, सहाय्यक फौजदार फड , बीट अंमलदार बांगर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनाम करून शवविच्छेदनासाठी मृतदेह गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यानंतर रात्री उशीरा भोजगाव येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिषेकच्या पश्चात आई- वडिल, एक भाऊ ,आजी- आजोबा असा परिवार आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान कोरोनाने सर्वत्र हाहाकार केल्याने नेक समस्या उभ्या राहिल्या आहेत.त्यातील समस्यांपैकी शाळकरी मुलाची आॅनलाईन शिक्षणासाठीची आत्महत्येची घटना ही जिल्ह्यात पहिलीच घटना म्हणावी लागेल.
Leave a comment