पीककर्जासाठी शेतकर्यांना त्रास
गेवराई । वार्ताहर
दमदार पावसाने तालुक्यातील विविध भागातील शेती कामांना गती आली असून, उसनवारी करून पेरणीची लगबग सुरू झाली आहे. पीक कर्ज मिळावे म्हणून शेतकरी बांधव बॅन्केच्या दारात उभा राहिला आहे. खरीप हंगामासाठी लागणारे पीक कर्ज अद्याप तरी मिळाले नाही. त्यामुळे, सन 2019 - 20 चे उद्दिष्ट कधी पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गेवराई तालुक्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली असून, यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.16 जून पर्यंत तालुक्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली असून, गेवराई- 61, उमापुर- 35, धोंडराई -16, चकलांबा- 17 , मादळमोही - 20, पाचेगाव- 19, सिरसदेवी- 56, जातेगाव- 59 तलवडा - 35, रेवकी-19 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहर व परिसरात पेरणीची लगबग सुरू झाली आहे. कपाशी लागवडी कडे सर्वाधिक शेतकर्यांचा अधिक कल आहे. त्या पाठोपाठ बाजरी, तूर, मूग, उडीद, मटकी, हुलग, आदी पिकांची पेरणी केली जात आहे. बाजारपेठ बी - बियाणे खरेदीसाठी गजबजून गेली आहे. हाती पैसा नाही, त्यामुळे गावच्या बड्या आसामी कडून उसनवारी करून, शेतकर्यांनी खते खरेदी केली आहेत. कृषी बाजारपेठेत जास्तीचे पैसे घेऊन बियाणे, खते विक्री केली जात आहेत. युरीया सारख्या महत्त्वाच्या खतांचा तुटवडा निर्माण केला जात असून, कमी पैशात खरेदी केलेली कमी दर्जाची खते शेतकर्यांच्या माथी मारली जात आहेत. काही दुकानदार शहरातील असल्याने, ग्रामीण भागातील शेतकर्यांना दादागिरी करून, अपमानास्पद वागणूक देत असल्याची चर्चा आहे. शेतकर्यांना कोणी वाली राहीला नाही, असे चित्र आहे. कृषी विभागाचे अधिकारी संजयकुमार ढाकणे यांच्याकडे अनेक शेतकर्यांनी तक्रारी केल्या आहेत. त्यांनी दखल घेतली असून, मंगळवार ता. 16 रोजी कृषी दुकानदारांनी संवेदनशीलता दाखवावी, असे आवाहन करून, चुका करणार्यांना कारवाईला सामोरे जावे लागले, असा इशारा दिला आहे. दरम्यान, खरीप हंगामासाठी लागणारे पीक कर्ज अद्याप तरी मिळाले नाही. जून चा महिना संपत आला तरी पैसा हाती पडला नाही. उलट कागदपत्राची मागणी करून, बॅन्केने अडवणूकीचे धोरण ठेवल्याने, शेतकर्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. दररोज बॅन्केच्या दारात उभे राहावे लागते. बॅन्का सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत अर्ज दाखल करून घेतात. बँकेने शेतकर्यांसाठी चार तास दिले असून, ही एक प्रकारची चेष्टा केली जात असल्याने नाराजी आहे. दरम्यान, चांगला पाऊस पडला असून, पेरण्या सुरू झाल्या आहेत.
Leave a comment