बीड । वार्ताहर
खरीप हंगामात बोगस बी-बियाणे, खतांची विक्री करुन खाबूगिरी करणार्यांना कृषी विभागाने गुरुवारी (दि.18) जोरदार दणका दिला आहे. पाच कृषी दुकानांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले असून पाच दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर.एस. निकम यांनी खरीप हंगामांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय पथके तैनात आहेत. 8 जून रोजी या पथकाने बीडमधील व्यंकटेश ग्रो एजन्सी या दुकानावर छापा टाकून कपाशीचे फ्लेक्सीकॉट व रेडीकॉट या नावाचे बोगस संकरीत बियाणांचे 46 पाकिटे जप्त करुन गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर विविध ठिकाणी तपासणी सुरु होती. यामध्ये अनियमितता आढळलेल्या दुकानांची सुनावणी अधीक्षकांकडे घेण्यात आली. सुनावणीदरम्यान विक्री परवाना नसणे, नुतनीकरण न करता विक्री करणे, नोंदी अद्ययावत न ठेवणे, खरेदी,-विक्री बिले न देणे, दर्शनी भागात साठा व भावफलक न लावणे व बोगस खत व बियाणाची जादा दराने विक्री करणे अशा गंभीर त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे अधीक्षक आर.एस. निकम यांनी पाच दुकानांचे परवाने कायमस्वरुपी रद्द केले. यात माजलगाव तालुक्यातील मोरेश्वर बीज भांडार, सुमित ग्रो एजन्सी, सद्गुरु कृषी सेवा केंद्र, दीपक बीज भांडार, बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथील शिवकृपा ग्रो एजन्सी या दुकानांचा समावेश आहे. यासोबतच पाच केंद्रांचे परवाने निलंबित केले असून त्यात माजलगाव तालुक्यातील नमन कृषी सेवा केंद्र, ज्ञानेश्वर बीज भांडार, बीडमधील नागनाथ कृषी सेवा केंद्र, श्रीराम ग्रो एजन्सी, गेवराईतील राठी कृषी एजन्सी यांचा समावेश आहे. सोबतच गेवराईतील हात्ते कृषी एजन्सी यांना ताकीद देण्यात आली आहे. तपासणीदरम्यान विविध कृषी केंद्रांतून खताचा 38.37 मे.टन खताचा साठा जप्त केल्याचे कृषी विभागाने सांगितले.
Leave a comment