सचिव शिनगारे यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश
आ.संदिप क्षीरसागरांच्या तक्रारीनंतर गंभीर बाबी उघड
बीड । वार्ताहर
बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेले घोटाळे दडपण्यासाठी सचिवाची बेकायदेशीरपणे नियुक्ती केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. बीडचे आमदार संदिप क्षीरसागर यांनी सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सदरील तक्रारीच्या अनुषंगाने उपनिबंधक सहकारी संस्था यांनी चौकशी केल्यानंतर यात अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत.बेकायदेशीरपणे सचिवाची नियुक्ती केल्याचा स्पष्ट अहवाल देण्यात आला असून बेकायदेशीर नियुक्ती देण्यात आलेल्या सचिव शिनगारे यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवपदी सेवानिवृत्त दामोदर शिनगारे यांची अचानकपणे बेकायदेशीर नियुक्ती करण्यात आली. शासन निर्णयानुसार सदरची नेमणुक बेकायदेशीर असून त्यांना तात्काळ पदावरून हटवण्यात यावे व त्यांना दिलेलेे वेतन व मानधन वसूल करून बाजार समितीवर कायदेशीर कारवाई करावी असे पत्र आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना दिले होते. कृषी उत्पन्न बाजार समिती बीडने सचिव नेमणुकीबाबत ठराव घेवून सदर ठराव पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे पाठवला. परंतू त्यास अद्यापपर्यंत मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे सदर सचिव यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्याचबरोबर संचालक मंडळाचा ठराव याबाबत शासन निर्णयाचे पालन न केल्याचे दिसून येत आहे. यासह अनेक गंभीर बाबी जिल्हा निबंधक सहकारी संस्था यांच्या चौकशी अहवालात उघड झाल्या आहेत.
सभापती, संचालक मंडळावर होणार कारवाई?
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवपदी दामोदर दशरथ शिनगारे यांची बेकायदेशीरपणे नियुक्ती करण्यात आली. याबाबतचा ठराव घाई गडबडीत आणि शासन निर्णयाचे पालन न करता पणन महासंघाची मान्यता न घेता सभापती, उपसभापती, संचालक मंडळ यांनी हस्तक्षेप करून सेवानिवृत्त व्यक्तीकडे सचिव पदाचा कारभार दिला आहे. सदर नियुक्ती करतांना कुठल्याच शासन निर्णयाचे, नियमाचे पालन न झाल्याने सभापती, उपसभापतीसह संचालक मंडळ गोत्यात आले आहे. त्यांच्या कारवाई होणार असल्याचे दिसून येत आहे.
Leave a comment