माळेगावमध्ये चार तर बीडमधील एकाचा समावेश
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात बुधवारी (दि.17) आणखी 5 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी 4 जण केज तालुक्यातील माळेगाव येथील एकाच कुटूंबातील आहेत तर बीडच्या हिनानगरमधील एका 52 वर्षीय पुरुषाचा बाधित रुग्णात समावेश आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी ही माहिती दिली.
बुधवारी सकाळी बीड जिल्ह्यातून 58 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.यात जिल्हा सामान्य रुग्णालयातून 6, बीड कोव्हीड केअर सेंटरमधून 7,अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व गेवराई उपजिल्हा रुग्णालयातून प्रत्येकी 2, आष्टी ग्रामीण रुग्णालय 5, केज उपजिल्हा रुग्णालय 28 आणि परळी उपजिल्हा रुग्णालयातून 7 व्यक्तींच्या थ्रोट स्वॅबचा समावेश होता.
यातील 53 अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर उर्वरित 5 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. बाधित रुग्णांमध्ये केज तालुक्यातील माळेगाव येथील एकाच कुटूंबातील 38 व 62 वर्षीय पुरुष तसेच 36 वर्षीय महिला आणि 13 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. मंगळवारी सकाळी औरंगाबादच्या खासगी रुग्णालयात ज्या कोरोना बाधित वृध्द महिलेचा मृत्यू झाला होता, तिच्या कुटूंबातील हे सदस्य आहेत. याशिवाय बीड शहरातील हिनानगर येथील एका 52 वर्षीय पुरुषाचा बाधित रुग्णात समावेश आहे. मागील दोन दिवसात बहुतांश अहवाल निगेटिव्ह आलेल्या बीड जिल्ह्यात बुधवारी आणखी 5 कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान रुग्ण आढळलेल्या माळेगावमध्ये आता आरोग्य विभागाकडून कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक व्यवस्था म्हणून पुढील कार्यवाही केली जात आहे. बीडच्या हिनानगरमध्ये यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने कंटेटमेंट झोन घोषित केलेला आहे.
उद्या चार जणांना मिळू शकतो डिस्चार्ज
बीड जिल्ह्यात आजपर्यंत 95 कोरोना बाधितांची नोंद झाली असून यापैकी 28 जणांवर सध्या जिल्ह्यात उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत 65 जण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत तर उद्या गुरुवारी आणखी 4 व्यक्ती कोरोनामुक्त होवून घरी परततील अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.
Leave a comment