गेवराई । वार्ताहर
तालुक्यातील देवपिंप्री येथे बालविवाहाचा प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलीचे गावातील एका मंदिरात लग्न लावल्याप्रकरणी नातेवाईक, भटजी व अन्य तीस ते चाळीस अशा जवळपास 50 जणांंवर गेवराई ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2007 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
बालविवाहाचा हा प्रकार 11 जून रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास देवपिंप्री (ता.गेवराई) येथील एका डोंगररांगेतील मंदिरात घडला. बालविवाह लावल्याप्रकरणी गेवराईचे ग्रामसेवक रोहिणीकांत योगीराज घसिंग यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची सर्व माहिती घेत नंतर गेवराई पोलीसात रितसर तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरुन अल्पवयीन मुलीचे लग्न लावणारे तसेच या लग्नात उपस्थिती लावून आशिर्वाद देण्यासाठी आलेले व लग्न लावणारे भटजी अशा 50 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.सतिष खनाळ, सुनीता खनाळ, सुंदर खनाळ ( सर्व.रा.माटेगाव), लहु मंचरे, शिवाजी मंचरे, मंदाबाई मंचरे, अंकुश मंचरे, गोपीनाथ मंचरे, अंजली मंचरे (सर्व रा.देवपिंप्री) भटजी व इतर तीस ते चाळीस जणांचा आरोपीत समावेश आहे. उपनिरीक्षक योगेश टाकसाळ या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Leave a comment