कटचिंचोली येथील कारवाईत दोन ट्रॅक्टरसह जेसीबी जप्त
तलवाडा । वार्ताहर
तलवाडा ठाणे हद्दीतील मौजे कटचिंचोली येथील गोदावरी नदीपात्रात वाळू चोरांवर कारवाई करण्यासाठी पोलिस पथक दाखल झाले. मात्र पोलिस येत असल्याची कुणकुण लागताच वाळू चोरटे दोन ट्रॅक्टर आणि जेसीबी मशिन सोडून नदी पात्रातून पळून गेले. या कारवाईत पोलिसांनी वाळू चोरीसाठी वापरली जाणारी दोन ट्रॅक्टर, ट्रॉली आणि जेसीबी मशिन असा 24 लाख 40 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सोमवारी (दि.15) सायं.4 वाजेच्या सुमारास ही कारवाई झाली.
कटचिंचोली येथील गोदावरी नदीपात्रात अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून नंतर चोरटी वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड यांना सोमवारी दुपारी मिळाली. त्यानंतर त्यांनी पथकातील कर्मचार्यांना छापा मारण्याच्या सुचना दिल्या. पथकातील पोलिसांनी तलवाडा पोलिसांच्या मदतीने कटचिंचोली नदीपात्रात धाव घेतली. दरम्यान पोलिस पकडण्यासाठी येत असल्याचे पाहताच दोन ट्रॅक्टरचालक व एक जेसीबी चालक असे तिघे वाहन सोडून नदीपात्रातून पळून गेले. पोलिसांनी या ठिकाणाहून ट्रॅक्टर क्र. (एम.एच23 बी 7767)तसेच अन्य एक ट्रॅक्टर (पासिंग क्रमांक नसलेले) व जेसीबी मशिन जप्त केले. याप्रकरणी दोन ट्रॅक्टरचे चालक व मालक तसेच जेसीबी चालक व मालक यांच्याविरूध्द पोलिस हवलदार श्रीनिवास चनेबोईनवाड यांच्या फिर्यादीवरून तलवाडा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a comment