मसेवाडीच्या शेतकरी कुटूंबातील तिघांचा समावेश
लिंबागणेश । वार्ताहर
भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील तिघे ठार झाले. भीषण अपघाताची ही घटना सोमवारी (दि.15) लिंबागणेश परिसरातील मुळूक येथील पुलाजवळ घडली. माहिती मिळताच अपघातस्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली.
संजय बाळू सोनवणे (45), बंकट बाबू मोरे (50), व गोरख बबन मोरे (32 सर्व.रा.मसेवाडी, ता.बीड) अशी मयतांची नावे आहेत. या अपघातात दोघे जागीच ठार झाले तर गोरख मोरे यांचा लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु असताना दुपारी मृत्यू झाला. बंकट, संजय व गोरख हे तिघेजण दुचाकीवरुन (एमएच-23 एस-8146) बियाणे घेवून मसेवाडीकडे परतत होते. लिंबागणेश-मांजरसुंबा रस्त्यावरील मुळूक येथील पुलाजवळ समोरुन भरधाव आलेल्या कारने (एमएच-12 जेझेड-6727) दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात संजय सोनवणे व बंकट मोरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर उपचारादरम्यान गोरख मोरे यांचाही मृत्यू झाला. शेतकरी कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Leave a comment