शिरुरकासार । वार्ताहर
जीप व कारच्या अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला तर असून तीन जण जखमी झाले. बीड तालुक्यातील रायमोह ते शिरूरकासार रस्त्यावरील तागडगाव फाट्यावर रविवारी (दि.14) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अपघाती मृत्यू झालेले शिक्षक कोरोनाच्या अनुषंगाने स्थापन केलेल्या मानूर चेकपोस्टवर कार्यरत होते. सकाळी 8 ते रात्री 8 अशी ड्युटी संपवून गावी परतत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
तागडगाव फाट्याजवळ रविवारी रात्री 8.30 दरम्यान बीडहून तागडगावकडे जाणारी जीप ( एम . एच.15 बी .एन.-6436 ) आणि मानूरहून बीडकडे जाणार्या कारची क्र. (एम.एच.20 बीसी 4512) धडक होऊन अपघात झाला. या अपघातात लोणी येथील शाळेत कार्यरत असणारे मात्र, सध्या बीड येथील प्रगती विद्यालयात डेपोटेशनवर असणारे शिक्षक प्रशांत डी.कुलकर्णी हे शिक्षक जागीच ठार झाले. तर तिघे जबर जखमी झाले आहेत. जखमींची नावे समजली नाहीत.शिरूर ठाण्याचे जमादार अशोक शेळके यांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना बीड येथील रुग्णालयात हलवले आणि पाटोदा पोलिसांना माहिती दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रायमोहा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. अपघाती मृत्यू झालेले शिक्षक बीड येथे कुटूंबासह वास्तव्यास आहेत.
मयत शिक्षक प्रशांत कुलकर्णी हे मानूर चेकपोस्टवर कार्यरत होते. तेथील ड्युटी संपल्यानंतर रात्री आठ वाजता ते कारमधून बीडकडे निघाले होते. ते मुळचे लहुरी (ता.केज,ह.मु.गुरुकुल इंग्लिश स्कुलजवळ बीड) येथील राहिवासी आहेत. बीड येथील पत्रकार अतुल कुलकर्णी यांचे ते मावसभाऊ होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई-वडिल, भाऊ असा परिवार आहे.
Leave a comment