पिंपळवंडी । वार्ताहर
पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी अमळनेर परिसरात मृग नक्षत्राचा पाऊस वेळेत बरसल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून चेहर्यावर आनंद दिसत आहे. खरिपाच्या पेरण्या मृग नक्षत्रात झालेल्या पावसावरच अवलंबून असतात .मृग नक्षत्रात पाऊस पडला तर पेरण्याला प्रारंभ होऊन पिके जोमदार व उत्पन्न चांगले मिळते असा शेतकर्यांचा अनुभव आहे. या परिसरात 1 जून रोजी रोहिणी नक्षत्रातील पावसाने दमदार खाते खोलले व लगेच मृग नक्षत्राचा दिनांक 10 बुधवार पासून ते शनिवारपर्यंत जोरदार पाऊस बरसल्याने शेतातून पाणी निघून ओढे, नदी ,नाले खळखळून वाहिले. वेळेवर पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.
बळीराजा शेतातील मशागत नांगरणी, वखरणी , मोगडा पाळी आदी कामे उरकून पेरणी करण्यासाठी सज्ज झाला होता. पावसामुळे बाजारपेठेतील बी-बियाणे रासायनिक खतांच्या दुकानात बी-बियाणे खते खरेदी साठी शेतकर्यांची झुंबड उडाल्याचे चित्र कृषी दुकानात दिसत आहे. यावर्षी कोरोना चे संकट व मागील अनेक वर्षांपासून शेतकरी दुष्काळाच्या सावटात आहे. संकटात सापडलेल्या बळीराजाला शासनाने बी-बियाणे खते मोफत वाटप करून आधार देण्याची शेतकरी वर्गातून अपेक्षा व्यक्त केली जात होती परंतु याबद्दल शासन उदासीन असल्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर निघत आहे. बाजरी पिकाबरोबर कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद ही नगदी पिके घेण्याकडे शेतकर्यांची ओढ असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कापूस लागवडी बरोबरच अन्य पिके पेरणीला परिसरातील घेतला आहे शेतकरी शेती कामात मग्न असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे.
Leave a comment