बीड । वार्ताहर
घराबाहेर पडू नका, रस्त्यावर फिरु नका, अशा सूचना सातत्याने देऊनही काही लोक जमावबंदी आणि संचारबंदीचे उल्लंघन करित आहेत. हाच धागा पकडत जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या आदेशानुसार आज मंगळवारपासून जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी ड्रोन कॅमेर्याव्दारे गर्दीवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज, आष्टी, बीड ही सात शहरे आता ड्रोन कॅमेर्याच्या निगराणीखाली खाली राहणार आहे. दरम्यान सोमवारी (दि.30) शहरात त्याची ट्रायल घेण्यात आली. कायदा मोडणारे व विनाकारण बाहेर फिरणार्या लोकांना ड्रोन कॅमेर्याव्दारे डिटेक्ट करून त्यांच्यावर कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल केले जाणार आहेत. दरम्यान चेकपोस्टवरही पोलीस रात्र-दिवस बंदोबस्तावर राहणार आहेत.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने उपाययोजना करत सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी होणार नाही यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. मात्र तरीही काही शहरांमध्ये नागरिक संचारबंदी लागू असतानाही वाहनांसह रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. यापूर्वी अशा लोकांची वाहने पकडण्यात आली, काही जणांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. परंतू त्यानंतरही स्थिती सुधारत नसल्याने आता ड्रोन कॅमेर्याच्या निगराणीखाली तालुक्यांची ठिकाणे असलेल्या शहरावर वॉच ठेवला जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी हे आदेश दिले असून त्याची आज मंगळवारपासून अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे आतातरी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरणे बंद करावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
या ड्रोन कॅमेर्यांची सोमवारी चाचणीही घेण्यात आली आहे. आजपासून हे ड्रोन कॅमेरे बीड शहरासह गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज, आष्टी शहरावर वॉच ठेवणार आहेत.कोरोना विषाणूचा संचार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. दरम्यान अत्यावश्यक कारणाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये. सर्वांनाच कोरोनाचा धोका आहे. हा धोका पत्करुन बाहेर फिरल्यास आपणासही कोरोनाग्रस्त लोकांच्या संपर्कात येवुन हा आजार होण्याची शक्यता आहे.त्यामुळे कोरोनाची लागण होऊ नये यासाठी आपण घरातून बाहेर न पडणे व कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात न येणे यासाठी देशभरात जमावबंदी व संचारबंदी लावलेली आहे. ही संचारबंदी जणू काही आमच्यासाठी कैद आहे हे समजून या काळात पोलिसांना गुंगारा देत रस्त्यावर फिरत असतात अशा लोकांना समज देवून, लाठीमार करुनही हे प्रकार काही थांबत नाही. कोरोना हा लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असूनही याकडे काही लोक वारंवार सुचना देऊनही जमावबंदीचे उल्लंघन करित असल्याने पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार आता गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज, आष्टी, बीड ही शहरे ड्रोन कॅमेर्यांच्या निगराणी खाली राहणार आहे.
पोलीस तात्काळ कारवाई करणार-हर्ष पोद्दार
खासगी ड्रोन कॅमेरे भाडेतत्वावर घेतले आहेत. बीड पोलीस दलाकडे असलेल्या ड्रोन कॅमेर्याच्या सहाय्याने दररोज वेळोवेळी जास्त लोकसंख्या असलेल्या भागात, गर्दी असलेल्या भागात तसेच अरुंद रस्ते असलेल्या ठिकाणी ड्रोन पेट्रोलिंग करुन संचारबंदीचे नियम मोडणार्यांवर करडी नजर ठेवेल. लोक आढळून आल्यास पोलीस तात्काळ त्या ठिकाणी पोहचून कारवाई करतील त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केले आहे.
Comments (1)
Chhan
Leave a comment