मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात दि. १४ एप्रिलपर्यंत २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. गेल्या १० दिवसांपासून देश ठप्प झाला आहे. सरकारचे विविध नियोजित कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत किंवा पुढे ढकलण्यात आले आहेत. निवडणूक आयोगानेही देशातील काही निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. दि. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. परंतु, यामुळे आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचण वाढण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले उद्धव ठाकरे हे सध्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत. घटनेच्या कलम १६४ (४) नुसार त्यांना पदावर कायम राहण्यासाठी मुख्यमंत्री झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधान परिषदेचा सदस्य होणे आवश्यक आहे. ठाकरे यांनी २८ नोव्हेंबरला शपथ घेतली होती. त्यांना २८ मेपर्यंत आमदार होणे आवश्यक आहे.
दरम्यान, मेपर्यंत निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या नाही तर उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळाला राजीनामा देऊन पुन्हा शपथ घ्यावी लागेल, असे राज्य विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांनी म्हटले आहे.
कोरोना विषाणूमुळे मार्चमधील काही निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. येत्या २४ एप्रिलला विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त होत आहेत. निवडणूक आयोगाने अद्याप याची तारीख जाहीर केलेली नाही.
Leave a comment