संत मुक्ताईंनी घेतले आजोबा ब्र.गोविंदपंत यांच्या समाधीचे दर्शन
www.lokprashna.Com बीड | सुशील देशमुख
श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या संत मुक्ताईंचा पालखी सोहळा दोन दिवसांचा मुक्काम करून बीडमधून शुक्रवारी (दि.५) पाली (ता. बीड) गावाकडे मार्गस्थ झाला; तत्पूर्वी पेठ बीड भागातील श्री बालाजी मंदिरातून संत मुक्ताईंची पालखी सुभाष रोड मार्गे पुढे जात असताना बिंदुसरा नदीकाठी जैन भवनसमोर संत मुक्ताईंचे आजोबा ब्रह्मभूत गोविंदपंत कुलकर्णी यांच्या समाधी मंदिरात दाखल झाली. आजोबा आणि नातीच्या भेटीचा हा अनुपम्य सोहळा वारकऱ्यांनी 'याचि देही याचि डोळा' अनुभवत 'मुक्ताई, मुक्ताई,आदिशक्ती मुक्ताई' असा जयघोष केला. याप्रसंगी गोविंदपंत पालखी सोहळ्याच्या वतीने संत मुक्ताई यांच्या पालखीत साडी चोळीचा आहेर सुपूर्द करण्यात आला.
संत मुक्ताईंचा पालखी सोहळा आणि बीडकरांचे अनोखे नाते जोडले गेले आहे. गत 12 वर्षांपूर्वी संत मुक्ताईंचे आजोबा ब्र. गोविंदपंत कुलकर्णी यांच्या समाधी स्थळाचा शोध इतिहास संशोधकांना लागला. पुढे या समाधी स्थळाचा विकास करण्यात आला. या ठिकाणी सभामंडप उभारण्यात आला. दरम्यान तेव्हापासून दरवर्षी संत मुक्ताईंचा पालखी सोहळा बीडमध्ये दोन दिवसाच्या मुक्कामासाठी आल्यानंतर बीड बाहेर पडताना संत मुक्ताईंच्या पादुका आजोबा गोविंदपंत यांच्या दर्शनासाठी समाधीस्थळी नेण्याची परंपरा सुरू झाली; ती परंपरा अव्यहातपणे सुरू आहे.
यंदा बुधवारी संत मुक्ताईंचा पालखी सोहळा बीडमध्ये दाखल झाला होता. पहिल्या दिवशी माळीवेस हनुमान मंदिरात पालखीचा मुक्काम झाल्यानंतर गुरुवारी दुसऱ्या दिवशीचा मुक्काम पेठ बीड भागातील श्री बालाजी मंदिरात झाला त्यानंतर शुक्रवारी पहाटे ६ वाजता पेठेतील श्री बालाजी मंदिरापासून संत मुक्ताईंचा पालखी सोहळा मार्गस्थ झाला. सुभाष रोड, जैन भवन समोर पालखी आल्यानंतर पालखी सोहळा प्रमुख रविंद्र महाराज हरणे व इतर वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी रथातील संत मुक्ताईंच्या पादुका डोक्यावर ठेवून आजोबा गोविंदपंतांच्या समाधीस्थळी वाजत गाजत नेण्यात आल्या. याप्रसंगी वारकऱ्यांना संत मुक्ताई यांच्या नावाचा जयघोष केला. या ठिकाणी दोन्ही पादुकांचे पूजन करत दर्शन घेण्यात आले.
पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी गोविंदपंत यांच्या समाधीस्थळी दर्शन घेतले. नंतर माळीवेस आण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बार्शी रोड बार्शी नाका मार्गे पालखी सोहळा पाली गावात मुक्कामी विसावला. या मार्गावर ठिकठिकाणी नागरिक विविध संघटना यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी अल्पोहार आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देण्यात आली होती.
www.lokprashna.com #beed homepage
Leave a comment