ऑक्सीजनअभावी मृत्यू झालेल्या पत्नीला सर्वात उंच शिखर सर करुन अर्पण केली अनोखी श्रध्दांजली
बीड । सुशील देशमुख
अंगी जिद्द, संयम अन् संकटांशी सामना करण्याचे धाडस असेल तर वयाचे आकडे कधीच रोखू शकत नाहीत. ठरवलं तर असामान्य वाटणारे यश मिळवता येते असे प्रतिपादन जगातील सात खंडातील सात अतिउच्च बर्फाच्छादित शिखरे पादाक्रांत करण्याचा नवा विक्रम करणारे बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र शरद कुलकर्णी यांनी शनिवारी (दि.4) बीड येथे माध्यमांशी संवाद साधताना केले. त्यांच्या या गिर्यारोहणाच्या प्रवासात पत्नी स्व.सौ.अंजली कुलकर्णी याही सोबत होत्या. नेपाळमधील ‘मांऊट एव्हरेस्ट’ हे शिखर चढत असताना ऐनवेळी ऑक्सीजन संपल्याने अंजली यांचा दुर्देवी अंत झाला. त्यामुळे शरद कुलकर्णी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला, मात्र याही स्थितीत त्यांनी उरलेली चार सर्वात उंच शिखरे यशस्वी सर करत पत्नीला अनोखी श्रध्दांजली अर्पण केली.
जगातील सर्वांत उंच असलेले सात शिखरे सन 2014 ते 2022 या कालावधीत सर केल्यानंतर त्यांचा बीड येथील योगा ग्रुपच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त बीडमध्ये आलेले शरद कुलकर्णी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कुलकर्णी यांनी त्यांच्या गिर्यारोहणाचा एकंदर प्रवास मांडला. ते म्हणाले,जगातील सर्व उंच शिखरे सर करण्याचे मी आणि माझी पत्नी अंजली हिने ठरविले होते.यातील अनेक शिखरे आम्ही दोघांनी मिळून पार केले. शरद कुलकर्णी व त्यांच्या पत्नी स्व.सौ. अंजली यांनी आफिक्रेतील किलीमॉन्जारो, ऑस्ट्रेलियातील कोझीओस्को, नेपाळमधील माऊंट एव्हरेस्ट हे तीन शिखरे सोबत सर केली.
माऊंट एव्हरेस्ट शिखरावरील हिलरी स्टेपच्या पांईटजवळ अंजली यांचा शिखर चढताना 22 मे 2019 रोजी ऑक्सीजनअभावी दुर्देवी मृत्यू झाला. नंतर या दु:खातून स्वत:ला सावरत कुलकर्णी यांनी दक्षिण आफ्रिेकतील अॅकान्कगुआ, रशियातील माऊंट एब्रुस, उत्तर अमेरिकेतील माऊंट देनाली आलास्का हे शिखर सर केले. त्यानंतर 16 डिसेंबर 2022 रोजी अंटार्टिकातील माऊंट विन्सन हे शिखर सर करुन पत्नी अंजली यांनी पाहिलेले स्वप्न आणि केलेले प्रण पूर्ण करुन अनोखील श्रध्दांजली अर्पण केली. माऊंट विन्सन, माऊंट डेनाली,माऊंट एलबु्रस व माऊंट अकांन्कागुआ ही चार शिखरे सर करणारे शरद कुलकर्णी हे भारतातील पहिले जेष्ठ नागरिक ठरले आहेत हे विशेष. यापुढ बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातून येणार्या गिर्यारोहकांसाठी आपण सतत मार्गदर्शन करत राहणार असल्याची माहितीही यावेळी शरद कुलकर्णी यांनी दिली. यासंदर्भात बीड जिल्हाधिकारी यांच्याशी भेटून गिर्यारोहणाला चालना देण्यासाठी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.
हिंगणी,चौसाळ्यात प्राथमिक शिक्षण;
जाहीरात एजन्सीही चालवली
बीड तालुक्यातील चौसाळ्यापासून तीन कि.मी.अंतरावरील हिंगणी हे शरद कुलकर्णी यांचे मूळगाव. त्यांचे वडील सैन्य दलात होते.हिंगणी आणि चौसाळा येथेचे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले.नंतर माध्यमिक शिक्षण बीडमध्ये घेवून शहरातच चित्रकलेचे शिक्षण त्यांनी पुर्ण केले. नंतर मुंबईतील जे जे स्कूल ऑफ एप्लाईड आर्ट महाविद्यातून 1982 साली जी डी आर्ट ही पदवी घेतली. नंतर 1990 मध्ये मुंबईत स्वत:ची जाहीरात कंपनीही सुुरु केलीी. व्यवसायाच्या निमित्ताने अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्याचे काम केले. अन् याच दरम्यान दरवर्षी हिमालयात ट्रेकिगंसाठी त्यांनी सुरुवात केलीी.याच दरम्यान जगातील सात खंडातील सात अतिउच्च बर्फाच्छादित शिखरे पादाक्रांत करण्याचा संकल्प केला. अन् तो प्रत्यक्षात साकारलाही. असा विक्रम करणारे जेष्ठ नागरिक गटातील शरद कुलकर्णी हे भारत देशातील एकमेव गिर्यारोहक ठरले आहेत.
आवड जोपासण्यासाठी गिर्यारोहण
मरण तर अटळ आहे, ते कुठेही,कधीही येवू शकते असे जीवन जगताना आपण आपल्या आवडी, छंद जोपासण्यासाठी ते का जगू नये. हा कानमंत्र घेवून वाटचाल करत आम्ही पती-पत्नीने ’जेष्ठ नागरिक’ हा परवलीचा शब्द बाजूला ठेवून आपली आवड जोपासायची,त्यासाठी सतत कष्ट घ्यायचे अन् आपले ध्येय गाठायचे हा उद्देश ठेवून आजपर्यंत जगातील सर्वात उंच असलेली शिखरे यशस्वीरित्या सर केली अशा भावनाही पत्रकारांशी बोलताना शरद कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या. गिर्यारोहणासाठी वेळ लागतो, त्यासाठी सराव खुप महत्वाचा असतो. सातत्यपुर्ण सरावातून वयाची बंधने बाजूला सारुन प्रत्येकाला आपले गिर्यारोहणाचे स्वप्न पुर्ण करता येते असेही ते म्हणाले.
Leave a comment