भोकरदन-वार्ताहर
तालुक्यातील लिंगेवाडी गावात मळणीयंत्रात अडकून चालकाचा मृत्यू झाला. आज (दि.३ ) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. संदीप सुधाकर गाढे (वय 35, रा. बाभूळगाव) असे मृताचे नाव आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, सध्या खरीप हंगामातील सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. बाभुळगाव येथील संदीप गाढे या तरुणाकडे मळणीयंत्र असल्याने तो नेहमी मळनीची कामे करीत होता. आज सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान गावालगत असलेल्या लिंगेवाडी येथील सदाशिव साबळे यांच्या शेतात संदीप गेला होता. सोयाबीन काढण्यासाठी मळणी यंत्र सुरु असताना त्यात तांत्रिक अडचण आली. दुरुस्तीचे साहित्य घेऊन तो सुरु असलेल्या मळणीयंत्राची दुरुस्ती करत असतानाच त्याचा तोल गेल्याने संदीप मळणी यंत्रात ओढला गेला. हे पाहताच काहीजणांनी मळणीयंत्र बंद केले. मात्र, तोपर्यंत संदीपचा मृत्यू झाला होता. संदीपचे शीर धडा वेगळे झाल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.
शेळ्या चोरीस गेल्यानंतर घेतले होते मळणीयंत्र
संदिपने बाभूळगाव येथे शेळीपालन व्यवसाय सुरू केला होता. व्यवसाय चांगला सुरू असताना चोरट्यांनी सर्व शेळ्या चोरून नेल्या. यामुळे संदीपने मळणीयंत्र घेतले होते. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक लहान मुलगी, भाऊ असा परिवार असून त्याच्या अपघाती निधनाने घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Leave a comment