केज | वार्ताहर
बेकायदेशीररित्या चंदनाचे झाडे तोडून ते पत्र्याच्या शेडमध्ये साठा करून ठेवले. नंतर त्यातील चंदनाचा गाभा काढून साठवणुक करणार्या चंदनचोरांच्या टोळी गजाआड करण्यात आली.गेवराई तालुक्यातील उक्कडपिंपरी येथील मोरवड शिवारात आज शुक्रवारी (दि.21) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास पोलिस अधीक्षक आर.राजा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत व त्यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक आर.राजा यांना मौजे उक्कडपिंपरी (ता.गेवराई) येथील विष्णू साहेबराव बांगर हा बेकायदेशीररित्या त्याच्या साथीदारांना एकत्र जमवून परिसरातील चंदनाची झाडे चोरून तोडून स्वतःच्या मोरवड शिवारात आणत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. नंतर ते लोक आणलेले चंदनाची खोडे तासून चंदनाचा गाभा काढून पांढर्या पोत्यांमध्ये भरून शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये ठेवत.आर.राजा.यांनी ही माहिती सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावात यांना कळवत कारवाईच्या सूचना केल्या. त्यानंतर पंकज कुमावत यांनी स्वतः केज ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मिसळे व उपविभागीय कार्यालयाच्या कर्मचार्यांसह उक्कडपिंप्री येथे 21 जानेवारी रोजी पहाटे 2.30 वाजता छापा मारला असता सदर ठिकाणी एकूण 17 आरोपी जागीच मिळून आले. या सर्वांविरूध्द सहाय्यक निरीक्षक संतोष मिसळे यांच्या फिर्यादीवरून चकलांबा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत पोलिस कर्मचारी शफी इनामदार बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, राजु वंजारे, महादेव सातपुते, संजय टुले यांचा सहभाग होता.
पत्र्याच्या शेडमध्ये साठवायचे चंदन
9 लाख 38 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त
आरोपी परिसरातील चंदनाची झाडे तोडून आणत नंतर ते मोरवड शिवारातील एका पत्र्याच्या शेडमध्ये त्यातील खोडाचा गाभा काढून घेत असत. छापा मारल्यानंतर पोलिसांना या ठिकाणी 16 पोत्यांमध्ये 328 किलो चंदनाच्या खोडामधून काढलेला 7 लाख 87 हजार रूपये किंमतीचा चंदनाचा गाभा आढळून आला. तसेच कारवाईत चार दुचाकी, एक मोबाईल, चंदन तोडीसाठी व तासण्यासाठी लागणारे कुदळ, कुर्हाड, किकरे, वाकस असा एकूण 9 लाख 38 हजार 300 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाई दरम्यान 17 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तर अन्य तिघे फरार झाले.
Leave a comment