शेतकरी दहशतीखाली, शेतीतील कामे झाली बंद
परतूर - तालुक्यातील श्रीधर जवळा गावाच्या शिवारात मंगळवारी १६ नोव्हेंबर ला रात्री एका शेतकऱ्याला ऊसाच्या शेतात बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली होती, त्याआधी श्रीधर जवळा शिवाराला लागून असलेल्या मंठा तालुक्यातील हातवन येथेही या बिबट्या चे दर्शन झाले होते.तोच बिबट्या परतूर तालुक्यातील अवचार कंडारी येथे १८ नोव्हेंबर ला दिसल्याने बिबट्या ची भीती वाढली असून वन विभागापुढे त्याला पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
तालुक्यातील श्रीधर जवळा येथील शेतकरी कृष्णा राजबिंडे यांना मंगळवारी १६ नोव्हेंबर ला रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आपल्या ऊसाच्या शेतात पाणी देण्यासाठी गेलेले असतांना ऊसाच्या कडेला बॅटरीच्या प्रकाशात बिबट्या दिसला ,त्याला पहाताच त्यांनी गावाकडे धूम ठोकली होती.त्याअगोदर श्रीधर जवळा गावाला लागूनच असलेल्या मंठा तालुक्यातील हातवन गावाच्या शिवारात मंगळवारी रात्रीचं सात वाजण्याच्या सुमारास सुनील काळे हे शेतकरी ट्रॅक्टर वरून घराकडे येत असताना त्यांना ट्रॅक्टर च्या हेडलाईट समोर बिबट्या चालतांना दिसला होता.त्यांनी याचे मोबाईल शूटिंग ही केले होते. हाच बिबट्या १८ तारखेला परतूर तालुक्यातील अवचार कंडारी येथील शेतकरी रामभाऊ टेकाळे यांना रात्री साडेसात च्या सुमारास दिसला असल्याची माहिती साईनाथ टेकाळे यांनी दिली.त्यानंतर १९ तारखेला सकाळी तेथून दोन किमीवर कंडारी गावाच्या शिवरातच एका उसाच्या शेतात बिबट्याचे दर्शन झाल्याने उसबागाईतदार शेतकरी चांगलेच भयभीत झालेले आहेत. सध्या ऊसाला पाणी देण्यासाठी रात्रंदिवस शेतकरी शेतात आहे अशावेळी भीतीने शेतकरी मजूर शेतात जायला घाबरत आहेत. साईनाथ टेकाळे या युवकाने माहिती दिली.हा बिबट्या दुधना धरणाच्या बॅक वॉटर परिसरात फिरत असल्याने या ऊसाच्या पट्ट्यातील शेतकऱ्या पुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे.
श्रीधर जवळा व हातवन ही दोन्ही गावे निम्न दुधना धरणात पुरर्वसन झालेली असून या दोन्ही गावाचे शिवार लागूनच आहे.श्रीधर जवळा शिवाराला लागून पश्चिम दिशेला वाढोना व कंडारी शिवार आहे, या संपूर्ण शिवारात ८०% ऊस पीक असल्याने बिबट्याला लपायला जागा आहे. मंगळवारी रात्री हातवन व श्रीधर जवळा या दोन्ही गावात बिबट्या चा वावर आढळल्याने ग्रामस्थांच्या झोपा उडालेल्या होत्या. दरम्यान वनविभागाला याची माहिती देण्यात आली असून वनविभागाचे वनपाल अवचार व वनरक्षक असे चार कर्मचारी बिबट्या चा शोध घेण्यासाठी या दोन्ही गावात बुधवारी सकाळी येऊन गेले,बिबट्याला या परिसरात लपायला जागा भरपूर असल्याने त्याला पकडण्याचे काम कठीण असल्याचे सांगत त्यांनी ग्रामस्थांना जागरूक राहण्याच्या सूचना केल्या होत्या . आता १८ व १९ तारखेला हा बिबट्या कंडारी शिवारात दिसल्याने जवळपास १५ किमी च्या पट्ट्यात त्याचे वास्तव्य नजसेस पडलेले आहे. बिबट्या ने आतापर्यंत तरी कोणावर हल्ला केलेला नाही ही बाब त्यातल्या त्यात समाधान देणारी आहे.
Leave a comment