चाळीस वर्ष आमदारकी अन् दोन राज्यमंत्री देणार्या दैठणची दुरावस्था
स्वत:च्या गावालाच रस्ता नाही करता आला तर तालुक्यात काय रस्ते करणार?
बीड । वार्ताहर
जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गेवराई तालुक्याच्या राजकारणाला एक वेगळीच किनार आहे. पंडितांचे अन् त्यातही भावकीचे राजकारण म्हणून गेवराईच्या राजकारणाकडे पाहिले जाते. काका-पुतण्याचा संघर्ष गेवराईकरांनी जवळपास 40 वर्ष अनुभवला आहे. सुरुवातीला जेष्ठ नेते शिवाजीराव पंडीत आणि बदामराव पंडीत. त्यानंतर अमरसिंह पंडीत विरुध्द बदामराव पंडीत असा राजकीय संघर्ष सातत्याने चालूच आहे. पंडीतांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्या दैठण गावाकडे जाणार्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. पहिल्या टर्ममध्ये आ.लक्ष्मण पवारांनी रस्त्याचे काम केले, मात्र ते कामही वाहून गेले. ज्या दैठणने तालुक्याला 40 वर्ष आमदारकी दिली, दोन माजी मंत्री दिले, त्या दैठणच्या रस्त्याची मात्र दुरावस्था कायम आहे. आपल्या मूळगावी जाण्यासाठी रस्ता न करणारे दोन्ही पंडीत गेवराई मतदार संघातील जनतेला काय रस्ते देणार? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
गेवराई तालुक्याच्या राजकारणात भिष्माचार्य म्हणून ओळखल्या जाणार्या शिवाजीराव दादा पंडीत यांनी गेवराई तालुक्याचे जवळपास 35 वर्ष नेतृत्व केले. त्यांनीच खर्या अर्थाने तालुक्याला आकार दिला. साखर कारखाना, शिक्षण संस्था, कृषी विद्यालये व इतर संस्थांची स्थापना करुन तालुक्याला वैभव प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न केला. ते राज्याच्या मंत्रीमंडळात मंत्री होते. तद्नंतर त्यांचेच पुतणे बदामराव पंडीत यांनी देखील गेवराई मतदार संघाचे तीन वेळा प्रतिनिधीत्व केले. 1995 मध्ये युती सरकारच्या काळात त्यांनी गोदाकाठी रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावला. ते देखील युती सरकारमध्ये राज्यमंत्री होते. त्यानंतर अमरसिंह पंडीत यांनी देखील गेवराई तालुक्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांच्या काळात राज्यातील आमदारांकडून निधी घेवून राक्षसभूवनचा रस्ता करण्याचा प्रयत्न केला, पण तो पुर्ण होवू शकला नाही. विकासासाठी मोठमोठ्या संकल्पना आखणार्या अमरसिंह पंडीतांना विकासासाठी पाच वर्ष पुरले नाहीत आणि त्यानंतर त्यांचा विधानसभेत जाण्याचा योग आला नाही. दैठणच्या तीन पंडीतांनी तालुक्यात सत्ता गाजवली, मात्र त्यांच्याच गावात जाणारा रस्ता त्यांना करता आला नाही. गेल्या पाच वर्षांपूर्वी दोन पंडीतांच्या संघर्षामध्ये लक्ष्मण पवारांचा उदय झाला. ते थेट विधानसभेत पोहचले. त्यांनी मागच्या टर्ममध्ये लुखामसल्याजवळील पुलाचा प्रश्न सोडवला आणि काही प्रमाणात रस्त्याचे कामही केले.‘पंडीतांच्या दैठणला पवारांनी रस्ता दिला’ अशा स्वरुपाच्या बातम्या जवळपास सात ते आठ वर्षांपूर्वी वर्तमानपत्रात छापून आलेल्या आहेत. दैठणचे तिसरे पंडीत संभाजीअण्णा यांनी मराठवाडा वैधानिक विकास मंडळाकडूनदेखील या रस्त्यासाठी निधी आणला होता. त्या काळात नेमके कशाचे काम झाले? आणि किती काम झाले हे समजू शकलेले नाही. असे असतानाच आता गेल्या काही दिवसांपासून जोरदार पडलेल्या पावसामुळे लुखामसल्याजवळील पुलही वाहून गेला आणि रस्ताही वाहून गेला.
आता परिस्थिती अशी आहे की, दैठणला जायचे म्हणजे अगोदर विचार करावा लागतो, जाणे खरेच महत्वाचे आहे का? विशेष म्हणजे मागच्या टर्ममध्ये पंचायत समितीचे सभापती पदही अभिजित पंडीत यांच्या रुपाने दैठणकडेच होते. तरीही दैठणच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही हे दैठणकरांचे दुर्देवच म्हणावे लागेल. राजकारणात परस्परांना पाण्यात पाहणार्या पंडीतांनी रस्त्यासाठी तरी पाण्याबाहेर येवून गावासाठी एकत्र येवून हा प्रश्न मार्गी लावावा. तालुक्यात इतर कामांमध्ये विशेषत: वाळूच्या टेंडरमध्ये, जायकवाडीच्या मोठ्या कामामध्ये दोन पंडीत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एकत्र येवून काम करतात, त्याच पध्दतीने स्वत:च्या गावच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला तर गावातले लोक तरी निदान दोन्ही पंडीतांचे नाव घेतील. त्यामुळे आता जेष्ठ पंडीतांशिवाय स्वत:ला ‘युवा नेते’ म्हणवून घेणार्या दोन्ही पंडीतांच्या युवराजांनी मतभेद आणि मनभेद बाजूला ठेवून रस्ताचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
Leave a comment