जिल्ह्यातील इतर कारखान्यांकडेही पीएफची बाकी
बीड । वार्ताहर
सत्तेचा उपयोग कसा करायचा हे सत्ता असताना माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या लक्षात आले नाही, मात्र तीच बाब विद्यमान पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या चांगली लक्षात आली आहे. काही दिवसांपूर्वीच वैद्यनाथ बँकेचे प्रकरण गाजले. आता वैद्यनाथ कारखाना पुढे आला आहे. कारखान्यात काम करणार्या कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम जिल्ह्यातील इतर कारखान्यांनीही भरलेली नाही. कामगारांपेक्षा शेतकर्यांचे पैसे महत्वाचे आहेत. शेतकर्यांच्या पैशासाठी कारवाई झाली असती तर शेतकरी समाधानी तरी झाले असते. मात्र वैद्यनाथच्या या कारवाईमागे आगामी काळात होणारी कारखान्याची होणारी निवडणूक असल्याचे बोलले जात आहे. कामगार देखील कारखान्याचे सभासद असल्याने निवडणूकीत या कामगारांची मदत होवू शकते. हे या कारवाईमागचे गमक असल्याचे मानले जात आहे.
भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे. बँक खाते सील करुन पीएफच्या थकबाकी 1 कोटी 92 लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. ही कारवाई ईपीएफओ औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालय यांनी केली आहे. भविष्य निर्वाह निधी थकबाकीदारांत विरुद्धची या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
परळी वैजनाथ सहकारी साखर कारखान्याने कर्मचारी कामगारांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली होती. परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात स्थापनेची मार्च 2018 ते ऑगस्ट 2019 काळासाठीची पीएफची 1 कोटी 46 लाख रुपये थकबाकी होती. थकीत रक्कम वसूल करण्यासाठी सहाय्यक आयुक्त यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी वानखेडे यांनी ही कारवाई केली. यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये दुपारपासूनच पंकजा मुंडेंना दणका, अशा स्वरुपाच्या बातम्या सुरु झाल्या अन् एकच खळबळ उडाली. मूळातच जिल्ह्यामध्ये अंबासाखर, माजलगावचा सुंदरराव सोळंके कारखाना, गढीचा जयभवानी या कारखान्यांकडेही भविष्य निर्वाह निधीची पैसे थकलेले आहेत. शेतकर्यांचे पैसे दिल्यामुळे या कारखान्यांची ओरड झाली नाही. वैद्यनाथ कारखान्यामध्ये कामगारांचे वेतनही थकलेले आहे. मध्यंतरी कामगारांनी जेव्हा संप केला होता, त्यावेळी त्या संपामागे राजकारण असल्याचेही बोलले गेले होते. त्याचेवळी कारखान्याच्या अध्यक्ष पंकजा मुंडे यांनी या बाबतीत लक्ष घालायला हवे होते. मात्र ते न घातल्यामुळे हे प्रकरण वाढतच गेले. आता औरंगाबाद पीएफ ऑफिसचे क्षेत्रीय आयुक्त जगदीश तांबे यांनी ही कारवाई केली आहे. इतर कारखान्यांवरही अशा पध्दतीची कारवाई होवू शकते, मात्र सत्ता आणि राजकारण हे महत्वाचे असते हे ही लक्षात घेणे गरजेचे आहे.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे कोणतेही बॅक खाते जप्त झालेले नसून यासंदर्भात येत असलेल्या बातम्या चुकीच्या असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक जी पी एस दीक्षितूलू यांनी म्हटले आहे. दुष्काळ आणि अन्य आर्थिक कारणांमुळे वैद्यनाथ कारखाना सध्या आर्थिक अडचणीतून जात आहे. अशा कठीण परिस्थितीत अशा प्रकारच्या बातम्या देणं आणि शेतकर्यांचं भवितव्य धोक्यात आणणं हे एकूणच राजकीय खोडसाळपणाचे आहे. कारखान्याचे असे कोणतेही खाते सील झालेले नाही असे कार्यकारी संचालक दीक्षितूलू यांनी म्हटले आहे.
Leave a comment