पणनसह कापूस व्यापार्यांच्या क्लेमवर प्रश्नचिन्हच
बीड । वार्ताहर
गेल्या मार्च महिन्यामध्ये बीड-जालना महामार्गावरील राजवेअर हाऊसला लागलेल्या आगीमध्ये जवळपास 75 कोटीं रुपयांच्या कापूस गाठी जळून खाक झाल्या होत्या. यामध्ये पणन महासंघ आणि खासगी व्यापारी यांचे मिळून 28 हजार कापूस गठाणी होत्या. या प्रकरणी पंचनामा करुन पोलीसांनी तपास केला, मात्र राज वेअर हाऊसचे संचालक आणि बुलढाणा अर्बन बँकेचे अधिकारी यांनी हवे तेवढे सहकार्य पोलीसांना न केल्याने नेमकी आग कशामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. ग्रामीण ठाण्याचे पो.नि.संतोष साबळे यांनी या प्रकरणी तपास केला असून अद्यापही त्यांनी वरिष्ठांना अहवाल दिलेला नाही. आगीचे कारणच स्पष्ट नसल्याने तपासही पूर्ण होणार नाही आणि त्यामुळे इन्शुरन्स कंपनी नुकसान भरपाई देईल की नाही, यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पणन महासंघाचे जवळपास 46 कोटी रुपयांचे तर खासगी व्यापार्यांचे 9 ते 10 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ही नुकसान भरपाई मिळेल की नाही? या चिंतेने व्यापार्यांना ग्रासले आहे. दरम्यान राजवेअर हाऊसच्या मालकांनी या सर्वच प्रकरणात कानावर हात ठेवले आहेत.
बीड-जालना महामार्गावरील पारगाव जप्ती नजिकच्या राजवेअर या कापसाच्या वेअर हाऊसला लागलेल्या भीषण आगीत तब्बल 75 कोटी रुपयांचा कापूस आणि गठाणी जळून भस्म झाल्या होत्या. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास लागलेली आग दहा तासांनंतर सुद्धा आटोक्यात आली नव्हती. आग आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यातील चाळीस पेक्षा जास्त अग्निशमन विभागाचे बंब या ठिकाणी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते. मात्र दोन दिवस ही आग धुमसत होती. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
घटना घडल्यानंतर जवळपास आठवडाभराने पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा करत राखेचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. विशेष म्हणजे या गोडावूनमध्ये बुलढाणा अर्बन बँकेने पणन महासंघाने खरेदी केलेल्या कापसाच्या मोठ्या प्रमाणात गठाणी ठेवलेल्या होत्या. त्याही या आगीमध्ये जळून भस्म झाल्या होत्या. पोलीसांनी तपास करण्यापूर्वी बुलढाणा अर्बन बँकेकडून सर्व कागदपत्रे तपासून पाहिली. राजवेअर हाऊसचेही कागदपत्रे तपासून पाहिली. वेअरहाऊससाठी आवश्यक ती कागदपत्रे आहेत का, परवानग्या आहेत, फायर ऑडीट, स्ट्रक्चरल ऑडीट आदी बाबी देखील पोलीसांनी तपासल्या. यामध्ये वेअर हाऊस मालकांनी स्ट्रक्चरल आणि फायर ऑडीट केलेच नसल्याचे पुढे आले होते. एवढचे नव्हे तर ज्या दिवशी घटना घडली, त्या दिवसापर्यंत या वेअरहाऊसला वखार महामंडळाकडून जो परवाना लागतो आणि केंद्र सरकारच्या वेअरहाऊसिंगकडून जो परवाना लागतो तोच नुतनीकरण केलेला नव्हता असेही पोलीस तपासात पुढे आले आहे. पोलीस निरीक्षक साबळे यांनी वेअर हाऊसच्या संचालकांना पत्र देवून आग नेमकी कशामुळे लागली असेल याचा खुलासा आपण करावा अशी विचारणा केली होती; मात्र त्यासंदर्भातही वेअर हाऊसच्या संचालकांकडून पोलीस यंत्रणेला पत्र गेलेले नाही. त्यामुळे तपास आहे त्याच स्थितीत थांबला आहे. मध्यंतरी कोरोनाची दुसरी लाट आल्याने हे सर्वच प्रकरण थांबले होते. मात्र आता खासगी व्यापारी वेअर हाऊसच्या संचालकांकडे पैशासाठी तगादा लावू लागले आहेत. यामध्ये ज्या कंपनीचा विमा काढलेला असेल त्या कंपनीने क्लेमच मंजुर केला नाही तर या व्यापार्यांना पैसे भेटणार कोठून असाही प्रश्न पोलीस तपासानंतर उपस्थित होवू लागला आहे. यापूर्वी देखील अशा मोठ्या गोडावूनला ज्या आगी लागल्या त्यामध्ये इन्शुरन्स क्लेम 90 टक्के प्रकरणात झालाच नाही. त्यामुळे बीडच्या राजवेअर हाऊस प्रकरणी देखील क्लेम मिळेल की नाही याबद्दलही सांशकताच आहे.
Leave a comment