कोरोनाने मृत शिक्षकाच्या जागी पत्नीला पदस्थापना देत माणुसकी
बीड । वार्ताहर
आंतरजिल्हा बदलीने बीड जिल्हा परिषदेत आलेल्या 43 शिक्षकांना अखेर 9 महिन्यांच्या संघर्षानंतर सोमवारी पदस्थापना दिली गेली. स्काऊट भवनमध्ये सीइओ अजित कुंभार, शिक्षण सभापती बजरंग सोनवणे, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. कोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षकाच्या पत्नीला प्रथम प्राधान्य देण्याच्या शिक्षणाधिकार्यांच्या प्रस्तावाला सर्व शिक्षकांनी होकार देत माणुसकीचे दर्शन घडवले. यानंतर समुपदेशनाने सर्व शिक्षकांना 11 तालुक्यातील रिक्त पदांवर पदस्थापना दिली गेली.
जिल्हा परिषदेत ऑगस्ट 2020 मध्ये आंतरजिल्हा बदलीने 43 शिक्षक राज्यातील इतर जिल्हा परिषदांमधून आले होते तर, बीड जिल्हा परिषदेतून सुमारे 50 शिक्षक बदलीने इतर जिल्ह्यात गेले होते.बीड जिल्ह्यातून इतर जिल्ह्यांमध्ये जाणार्या शिक्षकांना कार्यमुक्त करुन बीड जिल्हा परिषदेने इतर जिल्हा परिषदांना पत्र पाठवून आमच्याकडे रिक्त पदे नसून आपल्या शिक्षकांना कार्यमुक्त करु नये असे पत्र पाठवले होते. तो पर्यंत अनेक जिल्हा परिषदांनी शिक्षकांना कार्यमुक्त केले होते तर त्यानंतरही काही जिल्हा परिषदांनी शिक्षकांना कार्यमुक्त केले. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या या सुमारे 43 शिक्षकांना बीड जिल्हा परिषदेत सामावून घेण्यास सुरुवातीला जिल्हा परिषदेने असमर्थता व्यक्त केली होती. यामुळे, शिक्षक अडचणीत सापडले होते. सेवेत असलेल्या जिल्हा परिषदांनी कार्यमुक्त केले तर बीड जि.प. सामावून घ्यायला तयार नाही अशी अवस्था झाल्याने हे शिक्षक अधांतरी लटकले होते. अखेर, शिक्षकांनी केलेले आंदोलन, निवेदन, समितीचा अहवाल यातून सोमवारी जिल्हा परिषदेने या शिक्षकांना सामावून घेत पदस्थापना दिली. समुपदेशनाने, पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया राबवली गेली. सीइओ अजित कुंभार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती बजरंग सोनवणे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, उपशिक्षणाधिकारी भगवान सोनवणे यांची उपस्थिती होती. तसेच विस्तार अधिकारी विठ्ठल राठोड, तुकाराम पवार, गिरीष बिजलवाड, प्रविण येवले, डी. एस. मुकाडे, लक्ष्मीकांत देशपांडे, राहुल गुंजेगावकर, दिलीप पुलेवाड, एच. एन. डोईफोडे, सुनिल नवले, तुषार शेलार, सुरेंद्र रणदिवे, अविनाश गजरे, मनोज लोखंडे यांनी ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी काम केले.
मृत शिक्षकाच्या जागी पत्नीची नियुक्ती
आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील माध्यमिक शाळेतील शिक्षक अभयकुमार पवार यांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी माधुरी शिंदे (पवार) यांना अभय यांच्या रिक्त पदावर पदस्थापना दिली जावी व त्यांच्यापासूनच या प्रक्रियेची सुरुवात करावी याबाबत शिक्षणाधिकार्यांनी सर्व शिक्षकांना आवाहन केले. सर्व शिक्षकांनी होकार देत माणुसकी दाखवून मालती यांना आधी पदस्थापना देण्याचा निर्णय घेतला.
घोडेबाजाराला चाप!
पदस्क्रीनवर तालुक्यांमधील रिक्त जागा दाखवून ज्येष्ठतेनुसार शिक्षकांना त्यांच्या पसंतीच्या जागेवर पदस्थापना दिली गेली. यामुळे बदल्या व नियुक्तीमधील घोडेबाजाराला चाप लागला. पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया झाल्याने शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.
Leave a comment