कोरोना रुग्णाच्या मृत्यूच्या आकड्यांचा घोळही तपासणार

बीड । वार्ताहर

कोरोना संसर्गात गतवर्षी पहिल्या लाटेत आणि याहीवर्षी चालू असलेल्या दुसर्‍या लाटेमध्ये बीडचा मृत्यूदर मराठवाड्याच्या आणि महाराष्ट्रातील इतर काही जिल्ह्यांच्या तुलनेत वाढताच आहे. बीड जिल्ह्याचा मृत्यदर गतवर्षी जवळपास 3 टक्क्यांवर पोहचला होता, तो दुसर्‍या लाटेमध्ये 1.99 टक्के इतका आहे. हा मृत्यूदर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त असून संसर्गाचे प्रमाणही जास्त आहे. मृत्यूदर वाढण्याची नेमकी कारणे काय? उपचार पध्दती चूकीची की यंत्रणा चुकीच्या पध्दतीने काम करते हे शोधण्यासाठी पुण्याच्या आरोग्य संचालक कार्यालयातील एक पथकच बीड जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी दाखल झाले. कडा, आष्टी येथील रुग्णालयांची तपासणी केल्यानंतर हे अधिकारी बीडमध्ये कारणीमिंमासा करत आहेत.
कोरोना संसर्गामध्ये गतवर्षीदेखील सुरुवातीला एप्रिलमध्ये पहिला रुग्ण सापडला होता, नंतर मात्र जूनमध्ये उच्चांक झाला होता. राज्याच्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत बीडचा आकडा वाढतच राहिला. त्यावेळी मृत्यूदरही वाढलेलाच होता. दुसर्‍या लाटेतही औरंगाबाद,नांदेड नंतर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीडचा मृत्यदूर आणि रुग्णसंख्या जास्त आहे. मार्चपासून यंदा दुसर्‍या लाटेचा संसर्ग जिल्ह्यात झाला. एप्रिलमध्ये विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी यंत्रणा कामाला लावण्यासाठी बैठक घेतली. त्यावेळीच कॉन्टक्ट ट्रेसिंग वाढवा, टेस्ट वाढवा अशा सूचना दिल्या होत्या. एवढेच नव्हे तर आरोग्य प्रशासनाच्या ढिसाळपणाबद्दल नाराजीही व्यक्त केली होती. त्यानंतर कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढू लागले. तसा मृत्यूदरही वाढू लागला. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने देखील बीडच्या मृत्यूदराबद्दल चिंता व्यक्त केली होती.

 

आजपर्यंत जिल्ह्यात 1601 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये इतर जिल्ह्यामध्ये झालेल्या मृत्यूची सर्वच नोंद आली असेही नाही. त्यामुळे हा आकडा वाढूही शकतो. मूळातच मृत्यूदर का वाढतोय? हाच प्रश्न आरोग्य विभागाला पडला आहे. त्यामुळेच आरोग्य यंत्रणा व्यवस्थित चालण्यासाठी, शासकीय आणि खासगी रुग्णालयात कोरोना बाधितांवर नेमके कोणत्या पध्दतीने उपचार केले जातात आणि हे उपचार केले जातात, काही कमतरता राहते का? रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज मिळेपर्यंत कोणते उपचार केले याचीही माहिती पथकप्रमुख डॉ.जी.एम.गायकवाड व युनिसेफचे समन्वयक डॉ.प्रशांत हिंगणकर हे जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून घेत आहेत. कडा, आष्टीसह बीड जिल्हा रुग्णालयाची या पथकाने पाहणी करत कोरोना वॉर्डाचा आढावा घेतला, वैद्यकीय अधिकार्‍यांकडून उपचाराबाबतची माहिती जाणून घेतली. गेवराई उपजिल्हा रुग्णालय आणि लोखंडी सावरगाव येथील जम्बो कोव्हिड सेंटलाही हे पथक भेट देणार असून सर्व माहिती जाणून घेणार आहे. बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा एकंदर कारभार आणि रुग्णांना दिली जाणारी उपचार पध्दती याबाबतचा सर्व अहवाल आरोग्य आयुक्तांना सादर केला जाणार आहे.

डेथरेट वाढीची कारणे शोधणार

जिल्ह्यामध्ये कोरोनाचा डेथरेट का वाढला? याची कारणीमिंमासा हे अधिकार करत असून रुग्णालयामध्ये  दाखल झाल्यानंतर रुग्णाचा किती दिवसानंतर मृत्यू झाला? त्याचा वयोगट किती होता, आणि त्याच्यावर काय उपचार केले गेले, रुग्ण सहव्याधिग्रस्त म्हणजे त्याला पूर्वी काही आजार होते का? या सर्व बाबींचा अभ्यास करुन डेथरेटची कारणे शोधली जाणार आहेत.

जिल्हा रुग्णालयाचीही झाडाझडती

जिल्हा रुग्णालयाचे प्रशासन आणि रुग्ण यांच्यामध्ये समन्वय नसल्याचे गेल्या काही दिवसात निदर्शनास आले आहे. रुग्णालयातील उपचार पध्दतीवर रुग्णांच्या नातेवाईकांनी अनेकवेळा संशय घेतलेला आहे. ऑक्सीजन व्यवस्थित मिळतो का? डॉक्टरांनी सूचवलेला उपचार, औषधी कर्मचारी वेळेवर देतात का? जेवण व्यवस्थित मिळते का? आदि बाबतीत या पथकाने रुग्णालयाची झाडाझडती घेतल्याचे सांगण्यात आले.

युनिसेफही सतर्क

कोरोनाची येणारी तिसरी लाट ही बालकांवर परिणाम करणारी असेल असे संशोधतानू पुढे येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेपासून ते थेट राज्याच्या आरोग्य खात्यापर्यंत सर्वांनीच ही भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे महिला व बालकांच्या आरोग्य व आणि पालनपोषणाबाबत जागतिक पातळीवर काम करणार्‍या युनिसेफ या संस्थेनेही याची दखल घेतली असून प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला जात आहे. बीड जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी आलेल्या आरोग्य पथकात युनिसेफचे समन्वयक डॉ.प्रशांत हिंगणकर यांचाही समावेश असून ते त्यांची सर्व निरीक्षणे युनिसेफला सादर करणार आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.