लॉकडाऊनमध्ये दुकाने उघडी ठेवून प्रशासनाला जेरीस आणले
बीड । वार्ताहर
गेल्या काही दिवसांपासून बीड शहरात आणि जिल्ह्यात त्याचबरोबर शहरालगत असलेल्या गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होवून दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासनाने गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात कडक निर्बंध जारी केले आहे. आठ दिवसांपासून राज्यसरकारच्या सुचनेनूसार लॉकडाऊन घोषित करण्यात आले असून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी पारित केले आहेत असे असतांनाही बीडमधील मोंढ्यात व्यापार करणार्या काही दुकानदारांनी पहाटे 4 वाजता दुकाने उघडून धंदा केल्याचा प्रकारही उघडकीस आला होता. मंगळवारी देखील मोंढा भागातील मोठमोठ्या व्यापार्यांची दुकाने उघडी असल्याने प्रशासनाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आणि दुकाने सील केली. गतवर्षी देखील असाच प्रकार घडला होता. या दुसर्या लाटेतही आतापर्यंत जवळपास 50 व्यापार्यांवर दंडात्मक कारवाई झाली आहे.प्रशासनाने आदेश पारित केल्यानंतरही दुकान उघडे ठेवून कोरोना वाढण्यास हातभार लावणार्या व्यापार्यांनी बीडच्या मोंढ्याची इज्जत घातली अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. प्रशासनाने वारंवार कारवाई करुनही हे व्यापारी सुधरत नाहीत यामुळे देखील आश्चर्य व्यक्त होत आहे.
कोरोना संकटात होत्याचे नव्हते झाले.. गतवर्षी लॉकडाऊनमध्ये सर्वच क्षेत्रामध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले. देशाचा विकासदर घसरला. कोरोनामध्ये संपर्क आणि संसर्ग हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे वारंवार सिद्ध झाल्यामुळे या दुसर्या लाटेत परस्परांशी संपर्क कमी करुन संसर्गाला कोरोनाच्या संसर्गाला रोखण्याचे आवाहन प्रशासनासमोर आहे. त्यातही मराठवाड्यात औरंगाबाद, नांदेडसारख्या मोठ्या शहरात कोरोनाचा आकडा कमी आला आहे. तिकडे पुणे, मुंबई देखील खाली उतरु लागली आहे. मात्र बीड जिल्ह्याचा आकडा वाढलेलाच आहे. एवढेच नव्हे तर इतर जिल्ह्याच्या तुलनेत बीडचा मृत्यूदरही वाढलेला आहे. मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी संसर्गाच्या सुरुवातीलाच बीडच्या प्रशासनाबद्दल आणि बीड जिल्ह्यातील काही व्यापार्यांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. दोन दिवसांपूर्वीच राज्याचे विरोधी पक्षनेंते देवेंद्र फडणवीस यांनी देखील बीडकडे जरा जास्त लक्ष द्यावे लागेल असे विधान केलेले आहे. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप हे स्वतः रस्त्यावर उतरुन नागरिकांना घरात बसण्याचे आवाहन करत आहेत, व्यापार्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करत आहेत. असे असतांनाही बीडच्या मोंढ्यातील व्यापारी मात्र केवळ आर्थिक फायद्याच्या लालसेपोटी आपली दुकाने उघडी ठेवून इतरांनाही अडचणीत आणत आहेत. हा प्रकार बीडच्या मोंढयाला शोभणारा नाही. त्यामुळे व्यापार्यांनी आतातरी भानावर यावे अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
रस्त्यावरील लहान दुकानदार समजदार
बीड शहरातील वेगवेगळ्या मार्गावर लहान लहान दुकाने थाटून व्यवसाय करुन आपली उपजिविका भागविणार्या व्यापार्यांची शहरात मोठी संख्या आहे. सुभाष रोडवरील आदर्श मार्केट, हिरालाल चौकातील, नगर रोडवरील, जालना रोडवरील लहान लहान दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली आहेत. मात्र सुभाष रोडवरील काही मोठी दुकाने आणि मोंढ्यातील काही दुकानदार प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता आपली दुकाने उघडी ठेवून धंदा करीत आहेत. त्यांच्या पेक्षा लहान दुकानदार समजदार आहेत अशी चर्चा शहरात सुरु आहे.
दंडात्मक कारवाई नको, कायदेशीर कारवाई हवी
वारंवार सुचना देवूनही दुकाने उघडी ठेवणार्या व्यापार्यांना आता शेवटच्या टप्प्यात दंडात्मक कारवाई करुन भागणार नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई प्रशासनाने करावी. लॉकडाऊनमध्ये दुकाने उघडी ठेवणार्या व्यापार्यांची दुकाने काही कालावधीसाठीच निलंबित करण्याचे कायदेशीर कारवाई प्रशासनाने करण्याची मागणी होत आहे.
कारवाई केवळ सुभाष रोड, मोेंढ्यातच!
लॉकडाऊन आणि कडक निर्बंधामध्ये किराणा दुकानांसह सर्वच व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत. केवळ औषधी दुकाने आणि दवाखाने यांना परवानगी आहे तसेच फिरुन भाजीपाला, फळे विकण्यास प्रशासनाने परवानगी दिलेली आहे असे असतांनाही मोंढ्यातील, सुभाषरोडवरील, नगररोडवरील दुकाने चालू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने कारवाई केली मात्र ही कारवाई न.प. प्रशासनाने मोमीनपुरा, बार्शीनाका, खासबाग, हिरालाल चौक कारंजा आदी भागात करण्याचे धाडस का दाखवले नाही असा सवालही कारवाई झालेल्या मोंढ्यातील व्यापार्यांनी केला आहे.
बाहेरुन आलेला माल उतरुन घेण्यास परवानगी हवी
बीड मोंढा व इतर भागात राज्यातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात मालाची आवक होते. व्यापार्यांनी लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी काही मालाची नोंदणी केलेली आहे. माल वाहतूकीस परवानगी आहे. मात्र माल उतरुन घेण्यास परवानगी नाही काल मंगळवारी मोंढ्यात माल उतरुन घेतांना नगरपालिकेच्या पथकाने काही व्यापार्यांवर कारवाई केली ही कारवाई चुकीची होती. प्रशासनाने माल उतरुन घेण्यास परवानगी द्यावी. कारण बाहेरून आलेले ट्रकचालक, किती दिवस बीडमध्ये थांबणार हा खरा प्रश्न आहे.
Leave a comment