जिल्हाधिकार्यांचे नव्याने आदेश जारी
बीड । वार्ताहर
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात 5 ते 7 मे दरम्यान कडक लॉकडाऊन लागू केला होता. कडक लॉकडाऊनची मुदत आणखी पाच दिवसांसाठी वाढविण्यात आली. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी शुक्रवारी (दि.7) यासंदर्भातील आदेश जारी केले.
बीड जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तीन दिवसांपासून लॉकडाऊनचे नियम अधिक कडक करण्यात आले होते. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आस्थापना आणि पेट्रोलपंप वगळता इतर सर्व व्यवहार पूर्णवेळ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पूर्वीच्या आदेशात शनिवार, रविवार हे दोन दिवस किराणा दुकान उघडता येणार होत्या. शुक्रवारच्या आदेशानुसार आता पाच दिवस कडक लॉकडाऊन कायम राहणार आहे. सकाळी 7 ते 10 या वेळेत भाजीपाला विक्रेत्यांना व दूध विक्रेत्यांना मुभा राहणार आहे. हातगाड्यावर किंवा पायी भाजीपाला, दूध विक्री करता येणार आहे. बँकेचे कामकाज सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत सुरु राहील. केवळ कोरोना कामासाठी नियुक्त शासकीय अधिकारी- कर्मचार्यांनाच संचारबंदीत मुभा असेल, असे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आदेशात नमूद केले आहे.
किराणा, चिकण,मटन दुकाने बंदच राहणार
12 मे पर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दवाखाने, मेडिकल, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित वाहतूक वगळता इतर सर्व दुकाने अगदी किराणा, चिकण, मटनची दुकाने, बेकरी या सुद्धा बुधवारपर्यंत पूर्णत: बंद राहणार आहेत. दरम्यान कृषी क्षेत्राशी संबंधित खते, बि-बियाणे आणि कृषि विषयक औषधांच्या वाहतूकीसाठी मात्र 8 ते 12 दरम्यान परवानगी देण्यात आली आहे.
Leave a comment