ओळखपत्र दाखवूनही आरोग्य कर्मचार्‍यांना बेदम मारहाण

चर्‍हाटा फाट्यानजिक वैद्यकीय अधिकार्‍यासही मारहाण 

बीड । वार्ताहर

 

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी तीन दिवसाचे कडक लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर अत्यावश्यक सेवामधील कर्मचार्‍यांना, लसीकरण केंद्रावर जाणार्‍यांना आणि कोव्हीड सेंटरमध्ये सेवा देणार्‍या लोकांना परवानगी दिली होती. कालच्या आदेशात तसा स्पष्ट उल्लेखही आहे मात्र पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके आणि त्यांच्या सहकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला हरताळ फासत रस्त्यावर दिसेल त्याला फोडून काढले. एवढेच नव्हे तर जिल्हा रुग्णालयात जावून लसीकरणासाठी उभा असलेल्या काही युवकांमध्ये कुरबुर झाल्याने तेथेही वाळकेंनी युवकांना बेदम मारहाण केली. एवढेच  नव्हे तर शहर पोलीस ठाण्यात आणूनही नेकनूरच्या फुटाणे कुटूंबातील पाठ आणि पार्श्वभाग अक्षरशः सोलून काढला. पोलीस उपअधिक्षक वाळकेंच्या डोक्यात कोरोनाचा सैतान शिरला होता की काय अशा संतप्त भावना व्यक्त केल्या गेल्या. दरम्यान या पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी कडक लॉकडाऊन लागू केल्यानंतर पोलिसांकडून विनाकारण घराबाहेर पडणार्‍या नागरिकांवर अ‍ॅन्टीजन टेस्टसह दंडात्मक कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु या दरम्यान अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी, बँकेचे कर्मचारी यांना हेल्मेट सक्तीच्या नावाखाली दंड आकारला जात आहे. शिवाय अपमानास्पद वागणुक देत जबर मारहाण केली जात आहे. असाच प्रकार बुधवारी (दि.5) सकाळी शहरातील माळीवेस चौकात घडला. उपअधीक्षक असलेल्या संतोष वाळकेंनी औेषधी दुकानातील दोन कर्मचारी तरुणांना बेदम मारहाण केली, यात ते जखमी झाले आहेत. दरम्यान सायंकाळी पुन्हा एका वैद्यकीय अधिकार्‍यास चर्‍हाटा फाटा परिसरात वाळके यांनी काठीने मारहाण केली, जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिवसभरातील या दोन घटनांमुळे यामुळे पोलीसांविषयी आरोग्य कर्मचार्‍यांनी संताप व्यक्त करत पोलीस अधीक्षक आर.राजा  यांना लेखी निवेदन देत कारवाईची मागणीही केली आहे.

 

बीड- बीडमध्ये पोलीसांनी बुधवारी कारवाईचा अतिरेक केला. लसीकरण केंद्रात गर्दी केली म्हणून   फुटाणे नामक तरुणांना पाठ सुजेपर्यंत मारहाण झाली शिवाय त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. तत्पुर्वी सकाळी माळीवेस भागात मेडीकलमध्ये काम करणार्‍या दोन तरुणांना हातामधून रक्तस्त्राव होईपर्यंत डिवायएसपी वाळके व पोलीसांनी मारहाण झाली तर सायंकाळी डॉ.विशाल वनवे यांना चर्‍हाटा परिसरात काठीचे वळ उमटेपयर्ंंत मारहाण केली गेली.

 

याबाबत दिलेल्या निवेदनात आयएमच्या पदाधिकार्‍यांनी म्हटले आहे, शहरातील सद्गुरु स्त्री रुग्णालयामध्ये काम करणारे चैतन्य शहाणे आणि राठोड क्लिनिकमध्ये काम करणारे विठ्ठल क्षीरसागर हे बुधवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या दुचाकीने रुग्णालयामध्ये सेवा रुजू करण्यासाठी माळीवेस चौकातून सकाळी जात होते. या दोघांना उपअधीक्षक संतोष वाळके यांनी माळीवेस चौकात अडवले. यावेळी दोघांच्याही गळ्यामध्ये रुग्णालयाने दिलेले ओळखपत्र होते आणि दोघांनीही आपले ओळखपत्र पोलिसांना दाखविल्यानंतर देखील संतोष वाळके यांनी ओळखपत्राची शहानिशा न करता, हे खोटे ओळखपत्र आहे असे स्वतःच जाहीर करून, वरील दोघांना जबर मारहाण केली. या मारहाणीत विठ्ठल क्षीरसागर याच्या हाताला जबर मारहाण झाली आणि त्यामध्ये त्याची दोन बोटे फ्रॅक्चर झाली असून मोठ्या प्रमाणावर जखम झाली आणि त्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. सदरील घटना झाल्यानंतर पोलीस अधीक्षक आर. राजा  यांना कळविण्यात आले असून त्यांनी संतोष वाळके यांना समज देऊ असे आश्वासन दिले. 
दरम्यान अशाच प्रकारे संपूर्ण शहरांमध्ये पोलिसांनी विविध ठिकाणी आरोग्य सेवा रुजू करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना काहीही शहानिशा न करता मारहाण केली आणि त्यामुळे आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये दहशत पसरली आहे. अशा प्रकारच्या पोलिसांच्या वर्तणुकीमुळे जर आरोग्य कर्मचार्‍यांनी सेवा रुजू करणे बंद केल्यास सध्याच्या कोरोना महामारीमध्ये हाहाकार निर्माण होईल आणि अशा परिस्थितीमध्ये होणार्‍या सर्व परिणामांना पोलीस यंत्रणा पूर्णपणे जबाबदार राहील.त्यामुळे अशा प्रकारच्या पोलिस कर्मचार्‍यांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही व्हावी अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अनुराग पांगरीकर यांनी पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. 

 

डॉ.विशाल वनवेंनाही बेदम मारहाण

आष्टी आरोग्य अधिकार्‍यांचे आज काम बंद आंदोलन

दरम्यान बुधवारी सकाळी औषधी कर्मचार्‍यांना वाळकेंनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या डॉ.विशाल वनवे यांना बीड शहरातील चर्‍हाटा फाटा येथे डीवायएसपी वाळके यांनी पोलीसांनी अमानुष मारहाण केली. यामुळे वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्‍यांत प्रंचड संताप व्यक्त केला जात असून या घटनेच्या निषेधार्थ आजपासून आष्टी तालुका आरोग्य अधिकार्‍यांनी कामबंदचा इशारा दिला आहे. डॉ.वनवे यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

 

 

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.