नेकनूर-बीड । वार्ताहर
वीज कोसळून बीड तालुक्यातील गर्भवती महिलेसह केज तालुक्यातील अन्य एका महिलेचा मृत्यू झाला. तर, अंबाजोगाईत आणि बीडच्या सानपवाडीतील पाच जनावरे मृत्युमूखी पडले. जिल्ह्यातील बहुतांशी भागात रविवारी (दि.2) दुपारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यादरम्यान या दुर्दैवी घटना घडल्या.
रविवारी दुपारी विजांचे अक्षरश: तांडव पहायला मिळाले. विशेषत: बीड, केज आणि अंबाजोगाई तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. बीड तालुक्यातील नेकनूरच्या लोखंडे वस्तीवरील राधाबाई दिपक लोखंडे (20) ही महिला दुपारी शेतात काम करत होती. पाऊस सुरू झाल्याने ती घराकडे परतत असताना तिच्यावर वीज कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. तर, राधाबाईच्या समोर असणारी तिची सासू किरकोळ जखमी झाली. मयत राधाबाई ही आठ महिन्यांची गर्भवती होती अशी माहिती सूत्रांनी दिली.दुसर्या घटनेत केज तालुक्यातील पिट्टीघाट येथील गीता जगन्नाथ ठोंबरे (वय 52) या महिलेचा मृत्यू झाला. गीता ठोंबरे या शेतात असताना त्यांच्यावर वीज कोसळली. दरम्यान नेकनूर जवळील सानपवाडीतही विजेचा कहर पाहावयास मिळाला. सानपवाडी शिवारात वीज पडून बाबासाहेब नामदेव गित्ते यांच्या मालकीचे दोन बैल ठार झाले. तर, अंबाजोगाई शहरातील मेंढी फार्मजवळ चांदमारी परिसरात वीज कोसळून आजीम खान यांच्या मालकीच्या दोन गाई आणि एक शेळी दगावल्याची घटना उघडकीस आली.
धनगरवाडीत वीज पडून दोन बैलांचा मृत्यू
आष्टी तालुक्यातील पिंपळा गावाजवळील धनगरवाडी येथे रविवारी दुपारी विज पडून झालेल्या दुर्घटनेत यामध्ये कैलास गावडे यांच्या घराशेजारी चिंचेच्या झाडाखाली बांधलेल्या दोन बैलांच्या अंगावर वीज कोसळून दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. यात जवळपास एक लाखापेक्षा जास्त रुपयाचे गावडे यांचे नुकसान झालेले आहे. पेरणीपूर्व मशागतीच्या अगोदर दोन्ही बैलांचा मृत्यू झाल्याने शेतकरी कैलास गावडे यांच्यावर मोठे संकट कोसळले असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Leave a comment