इंजेक्शन मिळवण्यासाठी नातेवाईकांची धडपड
बीड । वार्ताहर
रेमडेसिवीरअभावी जिल्हा रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून रुग्णांचे बेहाल सुरु झाले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने रुग्णांना रेमडेसीवीर देण्यात येतील या आशेवर दोन दिवसापासून ठेवले आहे. मात्र इंजेक्शनच न आल्याने काही रुग्ण तडफडू लागले आहेत तर रुग्णांचे नातेवाईक बाहेर इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपड करु लागले आहेत. प्रशासनाने यादीच न लावल्याने खासगी रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांनाही काल रिकाम्या हाताने जावे लागले. उपजिल्हाधिकारी प्रविण धरमकर यांनी नोंदणी झालेल्या रुग्णांची यादी तयार केली;मात्र रेमडिसीवर प्राप्त न झाल्याने लावलीच नव्हती. प्रसारमाध्यमांकडेदेखील रुग्णांच्या नातेवाईकांनी इंजेक्शन आले का? याची चौकशी केली. जिल्हा रुग्णालयातील एकाही अधिकार्याने या संदर्भात अधिकृत माहिती दिली नाही. दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांनीदेखील काल सायंकाळीच रेमडेसिवीर मिळवण्यासाठी आरोग्य संचालकांकडेही प्रयत्न केले. रात्री उशिरापर्यंत रेमडेसिवीर प्राप्त झाले नव्हते.
गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच काही लोक शासकीय यंत्रणेतील कर्मचार्यांना हाताशी धरुन रेमडेसिवीरचा काळाबाजार करत आहेत. दोन दिवसापूर्वीच रेमडेसिवीर विकताना तीन युवकांना पकडले.याचा तपासही आता पोलीसांनी सुरु केला आहे. यामध्ये नेमके काय बाहेर येते? याकडेही लोकांचे लक्ष लागून आहे. या परिस्थितीत जिल्हा रुग्णालयातच रेमडेसिवीर इंजेक्शन सहज मिळते यामुळे जिल्हा रुग्णालयात उपचार घेणार्या रुग्णांची संख्या गेल्या आठवड्यात कमालीने वाढली आहे. विद्यमान परिस्थितीमध्ये रुग्णालयात 600 पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. यातील 300 पेक्षा जास्त रुग्णांना दोन दिवसापूर्वीच रेमडेसिवीर आवश्यक होते;मात्र त्यांना अद्यापही इंजेक्शन देण्यात आलेले नाही. वार्डामध्ये उपचार घेणारे रुग्ण वार्डातील नर्स आणि वार्डबॉय यांच्याकडे सातत्याने रेमडेसिवीर इंजेक्शन कधी येईल? जगणे मुश्किल झाले आहे अशी याचना करत आहेत. मात्र त्याचा आरोग्य प्रशासनावर फारसा परिणाम झालेला नाही. जिल्हा प्रशासनानेही रेमडेसिवीर उपलब्ध करुन घेण्यासाठी काल प्रयत्न केले. रविवारीच उपजिल्हाधिकारी प्रविण धरमकर यांनी जिल्हा रुग्णालयातील 160 रेमडेसिवीर इंजेक्शन खासगी रुग्णालयातील रुग्णांसाठी उससणवारीने वाटप केले होते. जिल्हा रुग्णालयात आणि त्याचबरोबर खासगी रुग्णालयात रेमडेसिवीरच नसल्याने रुग्णांचे बेहाल होत असताना नातेवाईक हवालदिल झाले आहेत.
रात्री उशिरा पाचशे इंजेक्शन मिळणार
आरोग्य संचालक कार्यालयाकडून रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयाला 500 रेमडेसिवीर प्राप्त होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली होती;मात्र मध्यरात्रीपर्यंत हे इंजेक्शन रुग्णालयाला प्राप्त झाले नव्हते. जिल्हा रुग्णालयात 300 पेक्षा अधिक रुग्णांना रेमडेसिवीरची तातडीने गरज आहे. त्यामुळे हे 500 रेमडेसिवीर इंजेक्शन रात्री आली असतील तर काही रुग्णांना नक्कीच दिलासा मिळाला असेल. यातील काही इंजेक्शन खासगी रुग्णालयाला देण्यासाठी नियोजन केले जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.
काळ्या बाजारात विक्री;चौकशी रुग्णालयापर्यंत
दोन दिवसापूर्वी रेमडेसिवीर काळ्याबाजारात विकताना पकडले गेले. या इंजेक्शनवरील बॅच नंबर आणि इंजेक्शन क्रमांक अन्न व औषध प्रशासनाकडून पोलीसांनी तपासून घेतला असून सदरील इंजेक्शन जिल्हा रुग्णालयातून बाहेर आले काय? याचा तपास पोलीस करत आहेत. कारण इंजेक्शनचा काळाबाजार करणार्या युवकांना पकडल्यानंतर रुग्णालयाचे भांडारपाल आदिनाथ मुंडे हे दोन दिवसापासून गायब होते. त्यांच्या वडिलांच्या तब्येतीचे कारण सांगीतले गेले. ते खरे की खोटे याचाही तपास पोलीस घेत आहेत.त्यामुळे ही चौकशी रुग्णालयापर्यंत गेली आहे.
Leave a comment