धनूभाऊ परळीत बसण्यापेक्षा बीडमध्ये येवून यंत्रणा हलवा!
बीड । वार्ताहर
एक तर संकटाच्या काळामध्ये पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमध्येच बसून यापूर्वीच यंत्रणा सजग करायला पाहिजे होती. गेल्या दोन-तीन आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे जे हाल सुरु आहेत ते कोणालाही पाहवत नाहीत. कोणीतरी जबाबदारी घेणारा असायला हवा. जिल्हा प्रशासन,आरोग्य प्रशासन आणि औषधी प्रशासन या तिघांनीही हात वर केले आहेत. झोपेचं सोंग घेतलेल्या अधिकार्यांना उठवायचे तरी कसे? अशी परिस्थिती आहे. पालकमंत्री काल जिल्ह्यात दाखल झाले;मात्र ते परळीत जावून बसले. उंटावर बसून कारभार चालवता येता नाही, त्यासाठी मैदानातच यावे लागते. त्यामुळे धनूभाऊ बीडला येवून यंत्रणा हलवा. यंत्रणेतील प्रमुख अधिकारी सुस्त झाले आहेत. काही काम करणारे लोक मरत आहेत. यंत्रणा सुस्त झाल्याने लोकही भयभीत झाले आहेत.
रेमडेसिवीर आणि ऑक्सीजन हे दोन कळीचे मुद्दे झाले आहेत. दोन दिवस पुरेल इतकाच जिल्ह्यात ऑक्सीजन साठा आहे. रेमडेसिवीरचा पत्ता नाही. पालकमंत्री म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे. इतर जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी ज्या पध्दतीने इंजेक्शन उपलब्ध करुन घेतले, तसे काही तरी करा. आपण नाथ प्रतिष्ठानच्या वतीने 250 इंजेक्शनची घोषणा केली होती, त्याचे काय झाले? हे प्रशासनाला आणि तुम्हालाच माहित. काम करायचा अवाका असतानाही, निर्णयक्षमता असतानाही आणि अधिकार असतानाही अशी हतबलता का आली हाच प्रश्न जनतेला पडला आहे. सत्तेतला माणूस हलला की प्रशासन हलते, पण इथे प्रशासनावर अंकुश ठेवणारा आणि प्रशासन चालवणारा माणूसच नाही. शासन आणि प्रशासनात समन्वय नाही. प्रशासनात जे तीन-चार प्रमुख अधिकारी आहेत ते लोकांना भेटत नाहीत, पत्रकारांचे फोन उचलत नाहीत, पदाधिकार्यांना अपमानास्पद वागणूक देतात. शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांनादेखील मान मिळत नाही.प्रमुख अधिकारी जरी सुस्त असले तरी खालच्या यंत्रणेमध्ये असलेले कर्मचारी मात्र अहोरात्र रुग्णसेवेचे काम करत आहेत.त्यामुळेच अनेकांचे जीवही वाचले आहेत;मात्र हे किती दिवस चालणार?
जिल्ह्याची परिस्थिती विदारक आहे.रेमेडेसिवीर इंजेक्शनसाठी नातेवाईक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.गित्ते यांच्या कार्यालयासमोर दिवस-दिवस रांगा लावून उभे आहेत. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकार्यांनी जनता आणि प्रसारमाध्यमांतून ओरड झाल्यानंतर यामध्ये लक्ष घातले आणि पुन्हा अधिकृत विक्रेत्याकडे हे इंजेक्शन उपलब्ध करुन दिले. आता जिल्हा शल्य चिकित्सकांच्या परवानगीनंतरच विक्रेत्यांना हे इंजेक्शन विक्री करता येणार आहे, त्यामुळे काळाबाजार होणार नाही, परंतु खासगी रुग्णालयात होणारा काळाबाजार कोण थांबवणार आहे. जिल्हा रुग्णालयातून देखील रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार झाल्याची चर्चा आहे. आता इंजेक्शनबरोबरच ऑक्सीजन आणि खाटा हा ही प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हा रुग्णालय, लोखंडी सावरगावचे रुग्णालय, एसआरटी रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये या ठिकाणी आवश्यक तो कर्मचारी वर्ग नाही. व्हेटिलेटर आहेत, पण ते चालवणारा प्रशिक्षित कर्मचारी नाही. त्यामुळे तालुका स्तरावर उपचार घेणार्या रुग्णांचे हाल होत आहेत. गेल्यावर्षी संकट आले, त्यानंतरही आपण काही यंत्रणा उभा करु शकलो नाही तर हे नक्कीच दुर्देव आहे. त्यामुळे परळीत बसून संपूर्ण यंत्रणा परळीत बोलवून काम करण्यापेक्षा बीडमध्ये बसून जनतेला दिलासा द्या. नाही तर ‘पहिले पाढे पंच्चावण’ अशीच काहीशी परिस्थिती निर्माण होईल अशी भावना जनतेतून व्यक्त केली जात आहे.
डॉ.सूर्यकांत गित्तेंना सक्तीच्या रजेवर पाठवा
डोईफोडेंना जिल्ह्यातून हाकला
आपण पालकमंत्री झाल्यानंतर गतवर्षी संकटामध्ये प्रशासनात असलेल्या अधिकार्यांनी चांगले काम केले. अधिकार्यांना कुठल्याही पक्षाचा शिक्का नसतो. एखादा अशोक थोरात सारखा अधिकारी असतो;परंतु त्यांनी गतवर्षी कोरोना काळात केलेले काम विसरता येणार नाही. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार, डॉ.अशोक थोरात, सीईओ अजित कुंभार या तिघांनी चांगले काम केल्याची पावती कोणीही देईल. मात्र आता चार महिन्यापूर्वी आलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांनी लोकांना हैराण करुन सोडले आहे. आपल्याजवळील मोबाइल लोकांशी संवाद साधण्यासाठी असतो, हेच या गित्तेंना माहित नाही. रुग्णालय प्रशासन पुर्णत: ढेपाळले आहे. कोणावरही वचक नाही. त्यामुळे डॉ.गित्तेंना सक्तीच्या रजेवर पाठवा आणि जिल्ह्यातील रुग्णांच्या जिवाशी खेळणार्या, रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्या व्यापार्यांशी मिलीभगत असणार्या औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे यांनाही जिल्ह्यातून बाहेर हाकला, तरच काही चांगले होईल अशी जनभावना व्यक्त होत आहे.
Leave a comment