रुग्णांना वाटप करून श्रेय घेण्यासाठी पुढार्यांचा आटापिटा
बीड । वार्ताहर
जिल्ह्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा पत्ता नाही, इंजेक्शनसाठी आणि इतर सुविधांसाठी रुग्ण धडपड करीत आहे.रुग्णांबरोबरच रुग्णांचे नातेवाईकही हताश होवून आपला माणूस वाचेल का? या भितीने त्रस्त झाले आहे.त्यातच जिल्ह्यात राजकीय पुढार्यांचे आणि लोकप्रतिनिधींचे श्रेय लाटण्याचे राजकारण सुरु असून इतके रेमडेसिवीर दिले असे जाहीर करत आहे. मात्र जिल्ह्यातील एकाही खासगी रुग्णालयात उपचारसाठी दाखल झालेल्या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळेनासे झाले आहेे. हे इंजेक्शन मिळावे यासाठी रुग्णांचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात अहमहमिका करत आहेत. जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीने यासाठी जबाबदारपणे लोकांना उत्तर दिलेले नाही. अथवा सोय केलेली नाही. त्यातच एका राजकीय पुढार्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुर्यकांत गित्ते यांच्याकडे जिल्हा रुग्णालयात आलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनमधून 500 इंजेक्शन मला द्या अशी मागणी करत त्यांच्यावर दबाव आणल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे. या संदर्भात डॉ.सूर्यकांत गित्ते यांच्याशी भ्रमणध्वणीवर संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला मात्र नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी फोन उचलला नाही. डॉ.सुर्यकांत गित्ते हे जिल्हाधिकार्यांचाही फोन उचलतात का नाही या बद्दलही चर्चा होवू लागली आहे.
रेमडेसिवीरचा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुटवडा असून इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाईक आणि रुग्णही जीवाचा आटापिटा करत आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रशिक्षण केंद्रावर कालही जवळपास 300 ते 400 नातेवाईकांनी इंजेक्शन मिळवण्यासाठी गर्दी केली होती. संध्याकाळी हाताश होवून अनेकजन परतले. शनिवारीच संध्याकाळी इंजेक्शन येतील असे सांगण्यात आले होते. मात्र रविवारी सायंकाळपर्यंत एकाही रुग्णाला इंजेक्शन अथवा नातेवाईकाला इंजेक्शन मिळाले नाही. दुसरीकडे मात्र पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या यंत्रणेकडून खुलासे काढून आम्ही इंजेक्शन दिलेच. यादीची खात्री करा असे सांगितले गेले. या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक यांनाही विचारणा करा असाही सल्ला देण्यात आला. पालकमंत्र्यांच्या आशिर्वादाने आलेेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.गिते धांदातपणे खोटे बोलत रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांची त्याच बरोबर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीचीही दिशाभूल करत आहे. जर रेमडेसिवीर आले असा दावा करत असतील तर खाजगी रुग्णालयात उपचार घेणार्या रुग्णांना रेमडेसिवीर का मिळत नाही. अन् औषध निरीक्षक डोईफोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.गित्ते या दोघांना जर अधिकार असतील तर त्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन संदर्भात वास्तव काय आहे. त्याची माहिती देणे गरजेचे आहे. जिल्ह्यात अथवा बीड शहरामध्ये एकाही खासगी रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णांना मिळत नाही. रुग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शन मिळण्यासाठी धडपड सुरु आहे. प्रसारमाध्यमांमध्ये मात्र या पुढार्याने एवढे दिले.त्या मंत्र्याने तेवढे दिले. अशा बातम्या येत आहे. त्यामुळे जनताही संभ्रमात आहे. मुळातच रात्री उशीरापर्यंत जिल्हा रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध झालेच नव्हते. दोन दिवसापूर्वी केवळ 50 इंजेक्शन आले होते. ते रुग्णालयाला आणि जिल्हा रुग्णालयातील रुग्णांसाठी वापरण्यात आले. त्यामुळे 250 काय आणि 2800 काय? हे इंजेक्शन सूर्यकांत गित्तेंनी ठेवले कुठे असा प्रश्नही विचारला जात आहे.
नाथ प्रतिष्ठानचे रेमडेसिवर आलेच नाही
इंजेक्शन आले ते केवळ 50!
दै.लोकप्रश्नने काल नाथ प्रतिष्ठानचे रेमडेसिवीर आले नाही असे वृत्त प्रकाशीत केल्यानंतर रविवारी सकाळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयातून त्याचा खुलासा काढण्यात आला. आमचे म्हणणे एवढेच होते की, इंजेक्शन आलेच नाही तर प्रशासन कसे आभार मानते, मुळातच नाथ प्रतिष्ठानने 10 हजार इंजेक्शनचे पैसे भरले असल्याचे सांगितले गेले. 250 इंजेक्शन जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाले असे शनिवारी जाहीर केले. या संदर्भात आम्ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते या समितीतील उपजिल्हाधिकारी धरमकर यांना विचारणा केली. त्यावेळी त्यांनी जिल्हा रुग्णालयात रेमडेसिवीर आले नाही असे स्पष्ट सांगितले. यावेळी 100 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते.त्यावर वृत्त प्रकाशीत झाल्यानंतर जो खुलासा काढण्यात आला. त्यामधे देखील 50 इंजेक्शन रात्री उशीरा दिल्याचे म्हटले आहे. याचाच अर्थ नाथ प्रतिष्ठानकडून 250 इंजेक्शन दिल्याची खोटी माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली हे तेवढेच खरे आहे. अद्यापही म्हणजे रात्री उशीरापर्यंत 150 इंजेक्शन जे की, नाथ प्रतिष्ठानकडून येणार होते ते रुग्णालयाला प्राप्त झाले नव्हते. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी हे इंजेक्शन आज दुपारपर्यंत देवून रुग्णांचे जीव वाचवावे एवढीच विनंती आहे.
Leave a comment