बीडमध्ये रविवारीही नातेवाईकांचा इंजेक्शनसाठी ठिय्या
रात्री उशिरापर्यंत एकाही नागरिकाला इंजेक्शन मिळालेच नाही
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात मुबलक रेमडेसिवीर इंजेक्शनचा जिल्ह्यात मुबलक साठा असल्याचे चित्र दाखवले जात असले तरी रविवारी (दि.18) जिल्हा रुग्णालयाच्या प्रशिक्षण केंद्रात शेकडो रुग्णांचे नातेवाईक एक-एक इंजेक्शन मिळवण्यासाठी मोठ्या आशेने बसून राहिले. या दरम्यान त्यांना रुग्णालय प्रशासनाच्या कोणाही जबाबदार अधिकार्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे जिल्ह्यासाठी आलेली इंजेक्शन नेमकी जातात तरी कुठे? असा प्रश्न रुग्णाचे नातेवाईक प्रशासनाला विचारताना दिसून आले. नंतर बराचवेळाने रुग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शनसाठी केवळ नावनोंदणी करण्यात आली; पण रात्री उशिरापर्यंत एकालाही इंजेक्शन मिळालेच नव्हते. यामुळे जिल्ह्यात रेमडेसिवीरसाठी कसा संघर्ष करावा लागत आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
बीड जिल्ह्यात रेमडेसिवीरसाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची होत असलेली फरफट रविवारी लोकप्रश्नने मांडली होती, त्यानंतर रविवारी दिवसभरही अशीच स्थिती बीडमध्ये दिसून आली. इंजेक्शन आले,ते दिले असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगीतले गेले, मात्र रविवारी सकाळपासूनच रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रशिक्षण संस्थेत ठिय्या मांडला होता. परंतु त्यांना इंजेक्शन मिळाले नाही. दुपारी 4 वाजेपर्यंत रुग्णालय प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकांच्या संयमाचा बांध फुटला व त्यांनी इंजेक्शनची मागणी लावून धरली. अखेर सहायक निरीक्षक राहुल कोलते, अमोल गुरले यांनी तेथे धाव घेत नातेवाईकांची समजूत काढली. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधीर राऊत यांनी सहायक निरीक्षक राहुल कोलते यांचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांच्याशी फोनवरुन बोलणे करुन दिले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सकांनी इंजेक्शन उपलब्ध नाही ;परंतु जसजसे उपलब्ध होतील तसतसे वितरित केले जातील. त्यासाठी अर्ज घेऊन नोंदणी करण्याचा पर्याय सुचविला. त्यानंतर रुग्णालय कर्मचार्याने अर्ज स्वीकारुन नोंद घेतली. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांची लांबलचक रांग लागली होती. गर्दी आवरताना पोलिसांना कसरत करवी लागली. मात्र, सायंकाळी सात वाजेपर्यंत इंजेक्शन मिळालेच नव्हते.एकीकडे जिल्ह्यात इंजेक्शन पुरवली जात असल्याचे लोकप्रतिनिधींकडून सांगीतले जात असले तरी रुग्णांना मात्र या इंजेक्शनचा तुटवडाच सहन करावा लागत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. आजही बीडमधील खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीरसाठी भटकंती करावी लागत आहे.
पोलीसांसमोर मांडल्या व्यथा!
बार्शी रोडवर जिल्हा रुग्णालयाचे प्रशिक्षक केंद्र आहे. सध्या जिल्हा शल्य चिकित्सक येथे बसतात, त्यामुळे अनेकजण रविवारी सकाळपासून उपाशीपोटी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या आशेपोटी रुग्णाची कागदपत्रे घेवून येवून बसली होती, मात्र त्यांना इंजेक्शन मिळणार की नाही, याबाबत बराचवेळ काहीच माहिती तिथे मिळाले नाही.दरम्यान गर्दी वाढू लागल्याने शिवाजीनगरचे सहायक निरी-गर्दी न करता दूर अंतर ठेवून थांबण्याचे सांगीतले. यावेळी उपस्थित नातेवाईकांनी आपल्या व्यथा पोलीस अधिकार्यांसमोर मांडल्या. ‘सकाळपासून इथे थांबून आहोत, इंजेक्शन मिळणार की नाही कोणी काहीच सांगत नाही, अशा भावना नातेवाईकांनी पोलिसांकडे व्यथा मांडली. इतके सारे करुनही रात्री उशिरापर्यंत कोणालाही रेमडेसिवीर इंजेक्शन मिळालेले नव्हते हे विशेष.
जिल्ह्यासाठी आलेली इंजेक्शन गेली कुठे?
लोकप्रश्नने बीड शहरात कोरोबा बाधितांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन वेळेवर उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर रविवारच्या अंकातूनही याच विषयावर आधारित वृत्त प्रकाशित करुन प्रशासनाने आतातरी हा विषय गांभीर्याने घेवून रुग्णांची मरणयातना थांबवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. कोरोना संकटकाळात जनसामान्यांचे होणार्या हालअपेष्ठा मांडणे हे माध्यमांचे कर्तव्यच आहे. जे चित्र दिसले तेच आम्ही मांडले. वाचकांनीही हे सत्य स्विकारले. मात्र जिल्ह्यातील जबाबदार पुढार्यांचा यामुळे इगो हर्ट झाला. ज्यांनी-ज्यांनी जिल्ह्यासाठी इंजेक्शन उपलब्ध केल्याची पत्रके काढली, त्यांची रेमडेसिवीर इंजेक्शन मग नेमकी गेली कुठे? रुग्णांना रविवारी पण ती इंजेक्शन का मिळाली नाहीत, शेकडो लोक प्रशिक्षण संस्थेत कशासाठी ठिय्या मांडून बसले? याचाही विचार सर्वच लोकप्रतिनिधींनी करण्याची गरज आहे.त्यामुळे विनाकारण लोकप्रतिनिधींनी त्याचा विपर्यास करुन घेण्यापेक्षा यापुढे तरी रुग्णांची एका-एका इंजेक्शनसाठी फरफट होणार नाही यासाठी पुढाकार घ्यायला हवा.
Leave a comment