फळविक्रीही हातगाड्यावर फिरून करावी लागणार
गर्दी रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेच्या वेळेत बदल
बीड । वार्ताहर
कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून शनिवारी जिल्ह्यात विक्रमी 1211 नवे रुग्ण निष्पन्न झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकाने,भाजीपाला, फळविक्री, बेकरी, चिकन मटण विक्रीची दुकाने केवळ चारच तास सुरू ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.आज सोमवारपासून या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती अतिशय बिकट होत चालली असून ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत अत्यावश्यक सेवेच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी घेतला आहे. त्यानुसार आता औषधी दुकाने वगळता इतर सर्व आस्थापना यापुढे सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू राहतील असे आदेश देण्यात आले आहेत, संचारबंदी दरम्यान रस्त्यावर विनाकारण होणारी गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी बीड जिल्ह्यासह राज्यात 14 एप्रिलपासून अधिकचे निर्बंध लावले गेले,मात्र तरीदेखील रस्त्यावरील गर्दी कमी होत नसल्याचे लक्षात आल्याने अखेर सोमवारपासून पूर्वीच्या आदेशात बदल केले गेले आहेत.नव्या आदेशानुसार मेडिकल वगळता किराणा, भाजीपाला, फळविक्री, बेकरी, चिकन मटण विक्रीची दुकाने सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचसोबत हातगाड्यावर फिरून फळविक्री करण्यासाठी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या या आदेशामुळे सार्वजनिक ठिकाणी होणार्या गर्दीला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Leave a comment