केज । वार्ताहर
जिल्ह्यात कोविड रूग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमधील गैरसोयी कायम आहेत. असाच प्रकार शहराजवळील दोन्ही कोविड केअर सेंटरमध्ये खुद्द शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या पाहणीत रविवारी दुपारी उघडकीस आला. जेवण, स्वच्छतेसह इतर गैरसोयींबाबात जिल्हाधिकार्यांकडे तक्रार करणार आहेत. यापुढे कोविड रूग्णांची हेळसांड शिवसेना सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
शहराजवळील शारदा इंग्लिश स्कूल व पिसेगाव येथील शासकीय वसतिगृहातील कोविड केअर सेंटरला जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी दुपारच्या सुमारासह अचानक भेटी दिल्या. यावेळी शारदा इंग्लिश स्कूलमध्ये दाखल रूग्णांशी त्यांनी संवाद साधला. याठिकाणी पिण्याच्या पाण्यासह वापरासाठीचे पाणीही उपलब्ध नसल्याचे रूग्णांनी निदर्शनास आणून दिले. तसेच, रात्रीचे जेवण सायंकाळी 11 वाजता मिळत असल्याची तक्रार ऐकताच मुळूक चांगलेच संतापले. त्यांनी थेट जिल्हाधिकार्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून सदरील प्रकाराबाबत गंभीर दखल घेण्याची सूचना केली आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय चाटे हे ही हजर होते. त्यानंतर त्यांनी पिसेगाव येथील येथील शासकीय वसतिगृहातील कोविड केअर सेंटरला 3 वाजता भेट दिली. यावेळी रूग्णांना सकाळचे जेवण मिळाले नसल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी तहसीलदार, जिल्हा शल्यचिकित्सक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून सरदील प्रकाराबाबत कार्यवाही करण्याची सूचना केली. रूग्णांना वेळेवर जेवण देणे शक्य होत नसेल तर ठेकेदार बदला, वाटेल ते करा, पण यापुढे रूग्णांची जेवणाबाबतची तक्रार पुन्हा आल्यास शिवसेना पदाधिकारी खपवून घेणार नाहीत, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. याप्रसंगी मुळूक यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे, विद्यार्थी सेना उपजिल्हा प्रमुख अनिल ठोंबरे, युवासेना शहर प्रमुख तात्या रोडे, वैद्यकीय कक्षाचे भारत तुपारे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
स्वच्छतागृहांची समस्या सोडवा
शहरातील शारदा इंग्लिश स्कूल येथील कोविड केअर सेंटरमध्ये रविवारी 165 रूग्ण दाखल होते. या रूग्णांसाठी केवळ 2 ठिकाणी 6 शौचालये सुरु आहेत. त्यामुळे गैरसोय होत असल्याची तक्रार रूग्णांनी केली आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करून शौचालयांचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला केल्या आहेत.
ठेकेदारांना नोटीस
याबाबत नोडल अधिकारी डॉ.दत्तात्रय चाटे म्हणाले, रविवारी रूग्णांना जेवण मिळण्यास उशीर झाला होता. वारंवार सूचना करून बदल होत नाही. याबाबत ठेकेदारांना नोटीस बजावली आहे. तसेच, तहसीलदार यांना माहितीस्तव कळविले आहे. तर तहसीलदार दुलाजी मेंढके म्हणाले, जेवण पुरवठा करणार्या संबंधित ठेकेदारास नोटीस बजावण्यात येईल. जिल्हाधिकारी यांच्याकडे कार्यवाही प्रस्तावित करणार आहे.
Leave a comment