बीड । वार्ताहर
कोरोना रुग्णाचे उशिरा निदान झाल्यामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी बीड जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून आता ‘मिशन झिरो डेथ’ अभियान राबवले जाणार आहे. येत्या 19 एप्रिल ते 10 मे या कालावधीत जिल्हाभर हे अभियान पूर्ण केले जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी ही माहिती दिली.
बीड जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्या साथीचा प्रसार वेगाने होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्या एक हजारापर्यंत पोहचली आहे. सद्यस्थितीत जिल्हयाचा मृत्युदर 2.10 इतका झाला आहे तर काही तालुक्यांमध्ये मृत्यूदर 3 वा त्यापेक्षाही अधिक आहे. कोरोना बाधितांचा वेळेत शोध घेवून त्यांना वैद्यकीय सुविधा व औषधोपचार पुरवण्याबरोबरच प्रशासकीय अथवा क्लिनीकल कारणामुळे होणारे मृत्यु कमी करणे व शुन्यावर आणणे ही जिल्हा प्रशासनाची प्राथमिकता आहे यासाठी पॉझिटिव्ह रुग्ण व त्यांचे सहवासीत, रोगाची लक्षणे असलेल्या व्यक्तीचा तात्काळ शोध घेवुन त्यांच्या कोरोना चाचण्या करणे व बाधित रुग्णांना तात्काळ औषधोपचार उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींचा शोध घेणे, त्यांच्या वेळेवर टेस्ट करणे, त्यांना त्वरीत लक्षणानुसार औषधोपचार तसेच वैद्यकीय सेवा देणे व त्यायोगे मृत्युचे प्रमाण कमी करुन ते शुन्यावर आणण्याच्या दृष्टीने ‘मिशन झिरो डेथ’ मोहिम राबवली जाणार आहे.
या सर्वेक्षणामध्ये ताप, सर्दी, खोकला , श्वास घेण्यास त्रास, पोटदुखी , हगवण,थकवा इ.कोविड सदृश्य इत्यादी लक्षणे असलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जाणार आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांचे ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेशन पल्स ऑक्सिमिटरद्वारे तपासणे व त्याची नोंद घेणे. कुटुंबातील लसीकरण पुर्ण झालेल्या व्यक्तींचा तपशील संकलीत करणे. कुटूंबामध्ये इतर आजार असलेल्या (कोमॉर्बीड ) असलेल्या व्यक्ती नियमितपणे त्या-त्या आजाराची औषधे घेतात का याची खात्री केली जाणार आहे. घेत नसल्यास याबाबत नियमित औषधोपचार घेणेचे महत्व पटवून देवून आवश्यक पाठपुरावा होईल.. 6. सर्वेदरम्यान 60 वर्षे वयांवरी व्यक्तींकडे विशेष लक्ष दिले जाईल. सर्वेदरम्यान रक्तातील ऑक्सिजन पातळी 95 टक्क्यांपेक्षा कमी दिसल्यास अथवा कोविड सदृश्य लक्षणे असल्यास संबंधित व्यक्तीस त्वरीत नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी पाठवावे. कोविड लक्षणे असणार्या व ऑक्सिजन पातळी कमी असणार्यया रुग्णांची चाचणी होणेसाठी आवश्यक पाठपुरावा करणे तसेच सर्व नागरिकांना वेळेत चाचणी करुन घेतल्यास रुग्णाचे मृत्युचे प्रमाण कमी होवू शकते हे पटवून सांगीतले जाईल.
असे असणार मिशन
या सर्वे मिशनचा पहिला टप्पा 19 एप्रिल ते 10 मे असा असणार आहे. यादरम्यान ग्रामपंचायत हद्यितील प्रत्येकी 100 घरांमागे दोन शिक्षकांची नेमणुक करुन त्यांच्यामार्फत सर्व शंभर कुटुंबे व कुटुंबातील सर्व सदस्य यांचे सर्वेक्षण केले जाणारे आहे. प्रतिदिन 100 या प्रमाणे सर्वेक्षण पुर्ण करुन नंतर त्याच पध्दतीने आठवड्यातून दोन वेळा असे एकुण अभियान कालावधीत किमान तीन वेळा कुटुंबाचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
मृत्युदर शुन्यावर आणणार्या गावांचा होणार सन्मान
तालुका पातळीवर या अभियानाचे नियोजन करण्याची जबाबदारी गट विकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची राहणार आहे. मिशन कालावधीत टेस्टींग,लसीकरण वाढवुन जनजागृतीद्वारे व योग्य उपाययोजनांद्वारे कोविड-19 मृत्युदर शुन्यावर आणणार्या गावांना तसेच ग्रामपंचायतीतील पदाधिकारी-अधिकारी-कर्मचारी यांना विशेष प्रमाणपत्र देवुन त्यांचा गौरव करण्यात येईल. तरी गट विकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी मिशनचे नियम व अमंलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी अथक प्रयत्न करावेत असे आवाहन सीईओ अजित कुंभार यांनी केले आहे.
Leave a comment