जिल्हा रुग्णालयातील सावळागोंधळ चव्हाट्यावर!
कोरोना रिपोर्ट देण्यात निष्काळजीपणा
रिपोर्ट पॉझिटिव्ह आला म्हणून अॅडमिट केले
मागणी केल्यावर रिपोर्ट दिला निगेटिव्ह
बीड । वार्ताहर
कोरोना संकटकाळात रुग्णांवर उपचार करण्यात आरोग्य यंत्रणा व्यस्त झालेली असतानाच धक्कादायक चूकाही समोर येत आहेत. बीड येथील एका रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर त्याला कॉल करुन ‘तुम्ही रुग्णालयात दाखल व्हा’ असे सांगीतले, त्यानंतर संबंधित रुग्ण खासगी रुग्णालयात दाखलही झाला. दरम्यान संबंधिताच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयातील रिपोर्ट दिला जाणार्या कक्षाशी संपर्क केला. त्यानंतर मात्र नातेवाईकासह रुग्णाचा मोठा धक्का बसला. कारण संबंधित कक्षातून दिलेला रिपोर्ट हा ‘कोरोना निगेटिव्ह’ होता. रिपोर्ट निगेटिव्ह असतानाही रुग्णाला कोव्हीडचे उपचार घ्यायला लावले. इतकी मोठी गंभीर चूक होतेच कशी? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
झाले असे की, बीड शहरातील एका नागरिकाने कोरोनासदृश्य लक्षणे जाणवू लागल्याने जिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर चाचणीसाठी दाखल झाला होता. त्यानंतर संबंधिताला कॉल करुन रुग्णालयातील कर्मचार्याने तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे सांगत रुग्णालयात दाखल व्हा असे सांगीतले. रिपोर्ट मात्र संबंधित नागरिकाला दिलेला नव्हता, त्यांच्यावर विश्वास ठेवत संबधित नागरिक खासगी रुग्णालयात दाखल झाला. 11 एप्रिल रोजी हा सर्व प्रकार घडला. दरम्यान रुग्ण आजही खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान 15 एप्रिल रोजी रुग्णाचा नातेवाईक रिपोर्ट मागणीसाठी जिल्हा रुग्णालयात गेला. तिथे संबंधित कर्मचार्यांनी त्या रुग्णाचा रिपोर्ट दिला मात्र त्या रिपोर्टवर चक्क ‘कोरोना निगेटिव्ह’ असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. हा रिपोर्ट पाहिल्यानंतर रुग्णासह त्याचे नातेवाईक हवालदिल झाले. कोरोना नसतानाही रुग्णाला उपचार घेण्यास भाग पाडले गेले. त्यामुळे संबंधित कुटूंबिय हतबल झाले असून खासगी रुग्णालयाचे हजारो रुपयांचे बील भरण्याची वेळ आता त्या रुग्णावर आली आहे. याबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनातील अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होवू शकला नाही.
निष्काळजीपणा करणार्यांवर कारवाई होणार का?
जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणीनंतर संबंधितांना रिपोर्ट दिले जातात. या घटनेत रिपोर्ट निगेटिव्ह असतानाही कॉल करुन कर्मचार्याकडून संबंधित नागरिकाला पॉझिटिव्ह आल्याचे सांगत रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला, वास्तविक रिपोर्ट मागीतला असा तो कोरोना निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. या अशा गंभीर चूकांवर रुग्णालय प्रशासन पांघरुण घालणार की, या प्रकरणाची सखोल चौकशी करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Leave a comment