जिल्ह्यात खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा कोरोेना रुग्णांसाठी अधिगृहीत
जगताप साहेब,आरोग्य प्रशासनालाही बुस्टर डोस द्या
बीड । वार्ताहर
गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा हाहाकार सुरु असताना महसूल आणि आरोग्य प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवण्यामध्ये दंग होते. विशेष म्हणजे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दोनवेळेस जिल्ह्यात येवून आढावा बैठक घेतली आणि कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी युध्द पातळीवर काम करण्याचे आदेश दिले होते, मात्र यंत्रणेमध्ये काहीही फरक पडला नव्हता.आता परिस्थिती हाताबाहेर जाते की काय? असे चित्र निर्माण झाले आहे. दोन दिवसापूर्वीच केंद्रीय आरोग्य पथक जिल्ह्यातील गावांत फिरले. त्यांनीही प्रशासनाला काही सूचना केल्या. जिल्हा रुग्णालयात जागा नाही, खासगी रुग्णालये उपचार करायला तयार नाहीत असे चित्र निर्माण झाल्यामुळे उशीरा का होईना जिल्हाधिकारी जगताप जागे झाले आणि अॅक्शन मोडवर आले आहेत. जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात आता 80 टक्के खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील 21 रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत उपचार मिळणार आहेत.
राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता अनेक ठिकाणी खाटा पुर्या पडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेशी संबंधित रुग्णालयांमधील 80 टक्के खाटा केवळ कोरोनासाठीच राखून ठेवाव्यात असे निर्देश या योजनेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. ज्योत्स्ना पाडियार यांनी राज्यातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी यंत्रणेला आदेश देवून जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयातील एकूण खाटांच्या 80 टक्के खाटा कोव्हीड रुग्णांसाठी अधिगृहीत करण्याचे आदेश दिले आहेत.
बीड जिल्ह्यात या योजनेंतर्गत 21 खासगी रुग्णालये असून यातील बीडमध्ये 14 तर परळीत 3, माजलगाव 1, गेवराई 1 आणि केज शहरात 2 रुग्णालये आहेत. त्यामुळे यातून जिल्ह्याला कोरोनासाठी सुमारे 736 खाटा नव्याने उपलब्ध होणार आहेत.राज्यातच कोरोना रुगणांसाठी खाटा कमी पडू लागल्या आहेत. त्यामुळे शक्य त्या ठिकाणाहून खाटा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यानंतर आता राज्यस्तरावरच महात्मा फुले जण आरोग्य योजनेशी संबंधित रुग्णालयांमध्ये 80 टक्के खाटा केवळ कोरोनासाठीच राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे निर्देश आरोग्य हमी सोसायटीच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सक आणि वैद्यकीय अधीक्षकांना देण्यात आले आहेत. या रुग्णालयांमधील 80 टक्के खाटा राखून ठेवून त्यातून रुग्णांवर योजनेअंतर्गत उपचार करावे लागणार आहेत. त्यामुळे साहजिकच रुग्णांवरील आर्थिक ताण देखील कमी होणार आहे. बीड जिल्ह्यात या योजनेअंतर्गत 21 रुग्णालये आहेत.ज्यांची क्षमता 100 ते 30 खाटांच्या दरम्यान आहे. आता या सर्व रुग्णालयांमधील 80 टक्क खाटा उपलब्ध झाल्या तर हा आकडा 736 इतका आहे.
या रुग्णालयातील खाटा आरक्षित
बीड: विठाई हॉस्पीटल- 40, वीर हॉस्पीटल-36, घोळवे हॉस्पीटल -32, स्पंदन हॉस्पीटल-32, लाईफलाईन हॉस्पीटल -32 , यशवंतराव जाधव मेमोरियल हॉस्पीटल-28, तिडके हॉस्पीटल -28, प्रशांत हॉस्पीटल 24, मातोश्री हॉस्पीटल-24, शुभदा हॉस्पीटल-24, पॅराडाईज हॉस्पीटल 39, कृष्णा हॉस्पीटल-24, सौ.केशरबाई क्षीरसागर हॉस्पीटल-29, काकू-नाना मेमोरियल हॉस्पीटल-56, गेवराई: माणिक हॉस्पीटल 40, माजलगाव: साबळे सर्जीकल हॉस्पीटल-40, परळी: मुंडे बाल रुग्णालय-80,कराड हॉस्पीटल-40, संत ज्ञानेश्वर हॉस्पीटल-40, केज: श्रेया हॉस्पीटल-24, योगीता नर्सिंग बाल रुग्णालय-24 अशा जिल्ह्यातील एकूण 21 रुग्णालयातील 736 खाटा कोव्हीड रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
Leave a comment