बाजारपेठ बंद, ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त
बीड । वार्ताहर
कोरोनाचा समुह संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरुन आठवड्याच्या दर शनिवारी व रविवारी पुर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर आज शनिवारी (दि.10) पहिल्या विकेंड लॉकडाऊनला सुरुवात झाली. यादरम्यान शुक्रवारी रात्री 8 वाजेपासून बंद झालेली अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व बाजारपेठ कडेकोट बंद राहिली आहेे. शहरासह जिल्हाभरात असेच चित्र दिसुन आले. काही ठिकाणी विनाकारण दुचाकी घेवून फिरणारे नागरिकही दिसुन आले. पोलीसांकडून चौका-चौकात खडा पहारा देण्यात आला आहे. बीडमध्ये पोलीसांकडून वाहन चालकांची कसुन चौकशी केली गेली. तसेच कोरोना बाधित रुग्ण होम आयसोलेट असलेल्या भागांमध्ये कंन्टेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. या परिसरातही पोलीसांनी ध्वनीक्षेपकाद्वारे बाधित रुग्णांनी घराबाहेर पडू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल अशी उद्घोषणा केली. तसेच कोणतेही दुकान उघडे राहणार नाही याची पेट्रोलिंग दरम्यान पाहणी केली गेली. शहरासह जिल्हाभरात या लॉकडाऊनला व्यापारी, नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे चित्र दिसुन आले.
नेकनूर पोलिसांनी शुक्रवारी काही व्यापाऱ्यांना दंड करून विनाकारण
फिरणाऱ्यांना लाठीचा प्रसाद दिल्याने शनिवारी बाजारपेठेत शुकशुकाट होता
बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना स्थिती बिकट होत चालली आहे. गुरुवार व शुक्रवारी जिल्ह्यात सलग दोन दिवस 700 हून अधिक बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. दर आठवड्याच्या विकेंडला म्हणजे शनिवार, रविवार अत्यावश्यक सेवा वगळता राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने बीड जिल्ह्यातही मेडिकल दुकाने, दवाखाने वगळता सर्व बंद ठेवण्यात आले आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत निर्बंध कडक केले असून दर आठवड्याच्या शनिवार व रविवारी पूर्ण लॉकडाऊनचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार आता शनिवारपासून येत्या सोमवारी सकाळी आठपर्यंत पहिल्या लॉकडाऊनला सुरुवात झाली. या दरम्यान कडक संचारबंदी असून या कालावधीमध्ये मेडिकल दुकाने, दवाखाना वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद राहणार आहे. नागरिकांना विनाकारण बाहेर फिरता येणार नाही. विकेंडला राज्य सरकारने संचारबंदी जाहिर केलेली आहे. त्याची कडक अंमलबजावणी महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये रूग्णांना दवाखान्यात जाण्यासाठी सूट दिली जाणार आहे. रूग्ण वाहिकेलाही यातून वगळण्यात आले आहे. मेडिकल दुकाने आणि सर्व खासगी दवाखानेही या कालावधीमध्ये सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दवाखान्याचे कारण, अंत्यसंस्कार वगैरे कारण सोडता घराबाहेर पडू नये असेही आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय होणार
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सूचक विधान
राज्यातील लॉकडाउन संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हणले आहे. तसेच, प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेऊन चालणार नाही,असं देखील त्यांनी बोलून दाखवलं आहे. याचबरोबर उद्यापासून दुकाने उघडण्याच्या व्यापार्यांच्या भूमिकेबद्दलही आज किंवा उद्या निर्णय होईल, अशी देखील माहिती यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आज सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षांचे नेते विरोधी पक्षनेते व महाविकासआघाडीमधील पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे.
करोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत दहावी आणि बारावीची परीक्षा तसेच निर्बंध शिथिल करायचे की अधिक कठोर करायचे यावर विचारविनिमय केला जाईल. रुग्णसंख्या कमी होत नसल्याने निर्बंघ अधिक कडक करण्याचा सल्ला कृती दल व अन्य तज्ज्ञांनी सरकारला दिला आहे.
देशात 24 तासांत आढळले 1,45,384 रुग्ण
महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांतही करोनाचं थैमान सुरूच आहे. करोना विषाणूच्या संसर्गाचा वेग प्रचंड वाढला असून, फेब्रुवारीपासून होत असलेल्या रुग्णवाढीने शुक्रवारी नवा उच्चांक नोंदवला आहे. मागील 24 तासांतील आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली असून, देशात 24 तासांत पहिल्यांदाच तब्बल एक लाख 45 हजार 384 नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर 800 रुग्णांना जीव गमावावा लागला आहे. दरम्यान याच कालावधीत 77 हजार 567 रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात करोनाच्या दुसर्या लाटेनं जेरीस आणलं असून, प्रचंड वेगानं संक्रमण होत आहे. गर्दी आणि करोना नियमाबद्दलची उदासिनता यामुळे दिवसेंदिवस रुग्णासंख्या नवा उच्चांक गाठताना दिसत आहे.
Leave a comment