जिल्ह्यात 239 व्हेंटिलेटर बेड तर ऑक्सीजनचे 921 बेड
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात लॉकडाऊन केल्यानंतरही कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. जिल्हा प्रशासनाकडून दररोज याबाबतचा आढावा घेवून आरोग्य प्रशासनाकडे किती खाटा उपलब्ध होत आहेत याची माहिती घेतली जात आहे. जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता खाटांचा प्रश्न उद्भवत आहे. जिल्हा रुग्णालयात गुरुवारी रुग्णसंख्या वाढल्याने 96 खाटा वाढवण्यात आल्या होत्या, त्यानंतर आणखी खाटा वाढवण्याचे नियोजन केले गेले आहे. तसेच अंबाजोगाई तालुक्यातही रुग्ण वाढू लागल्याने लोखंडी सावरगावच्या जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये रुग्णांना दाखल केले जात आहे.
जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात खासगी व सरकारी असे एकूण 36 कोव्हिड सेंटर व हॉस्पीटल आहेत. या ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांसाठी 3 हजार 721 खाटांची क्षमता आहे. त्यापैकी 2 हजार 721 खाटा प्रशासनाकडून मंजूर झालेल्या आहेत. सध्या जिल्ह्यात 1 हजार 900 कोरोना बाधीत रूग्ण उपचार घेत आहेत तर 916 खाटा शिल्लक आहेत. हा आकडा दररोज बदलतो. तसेच 1 हजार 721 सर्वसाधारण खाटा आहेत. जागेवर ऑक्सीजनची सुविधा असलेल्या 921 खाटा तर सिलेंडरव्दारे ऑक्सीजन पुरवठा केल्या जाणार्या खाटांची संख्या 661 इतकी आहे. तसेच जिल्ह्यात सध्या एकूण 253 आयसीयु खाटा आहेत. व्हेंटीलेंटर खाटांची संख्या 239 इतकी आहे. याबरोबरच ऑक्सीजनचे 728 जम्बो सिलिंडर असून 409 लहान सिलिंडर उपलब्ध आहेत. कोरोना महामारीच्या संकटकाळात रुग्णांवर योग्य उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा काम करत असली तरी कोरोना बाधितांची वाढती संख्या रोखणे हे मोठे आव्हान जिल्हा यंत्रणेसमोर आहे.
आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील दररोज वाढणार्या कोरोना बाधितांची संख्या, तसेच कोरोनामुक्त होवून घरी परतणार्या रुग्णांची संख्या याबाबतचा आराखडा तयार केला जातो. तसेच जिल्ह्यातील कोव्हीड सेंटर, हॉस्पीटलमध्ये असलेल्या एकूण मंजूर खाटा, व त्यावर उपचार सुरु असणार्या रुग्णांची संख्या याबाबतचा अहवाल सीईओ अजित कुंभार यांना सादर केला जातो. सध्या जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. या परिस्थितीत रुग्णांना खाटा मिळण्याबरोबरच ज्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, परंतु लक्षणे नाहीत अशा रुग्णांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये विलगीकरणात ठेवले जाते, तर लक्षणे असणार्या रुग्णांना डॉक्टरांच्या निगराणीखाली कोव्हीड हॉस्पीटलमध्ये उपचार केले जात आहेत. वेळप्रसंगी रुग्णांचे सीटीस्कॅन करुन त्याआधारे उपचार केले जातात.
केवळ आढावा नको अॅक्शन हवी!
जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या सर्वांसाठीच चिंताजनक ठरु लागली आहे. जिल्ह्यात दहा दिवसांचा लॉकडाउन करुनही फारसा फरक पडला नाही. कोरोनाच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून जिल्हा प्रशासनाने अहोरात्र काम केले आहे. आजही हे काम सुरु आहे. परंतु आता परिस्थिती अधिक नाजूक होत आहे, अशा स्थितीत आरोग्य विभागाकडून आता अधिकच्या आणि तातडीच्या उपाययोजना वेगाने होणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी कोरोना लाटेत बाधित रुग्ण सापडल्यानंतर तातडीने कॉन्ट्रक्ट ट्रेस करत संबंधितांची कोरोना चाचणी केली जायची. आता मात्र तसे होताना दिसत नाही. रुग्णवाढीबरोबरच मृत्यूदरही वाढत चालला आहे. ही सगळी परिस्थिती अशीच राहिली तर बाधितांचे प्रमाण वेगाने वाढू शकते, त्यामुळे कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्ष कृतीवर प्रशासनाने भर देण्याची गरज आहे.
बीडमधील कोरोना चाचणी प्रयोगशाळेचे भिजत घोंगडे कायम
बीड जिल्ह्यात सध्या अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात एकमेव कोरोना चाचणी प्रयोगशाळा आहे. या ठिकाणी दररोज किमान 1000 चाचण्या करण्याची क्षमता आहे. जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेवून गत महिन्यात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचा आढावा घेतला. महत्वाचे म्हणजे बीड जिल्हा रुग्णालयात तातडीने कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वीत करा, यासाठीचा निधी उपलब्ध करा, अशा सूचनाही जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या, त्यानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून या प्रयोगशाळेसाठीचा 1 कोटी 83 लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे पाठवण्यात आला खरा;मात्र पंधरा दिवस होवूनही पुढे काहीच हालाचाली झाल्या नाहीत. त्यामुळे ही प्रयोगशाळा प्रत्यक्षात साकारणार की असे भिजत घोंगडे कायम राहणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एकाच प्रयोगशाळेवर ताण; रिपोर्ट यायला लागतात दोन दिवस
बीड जिल्ह्यात अंबाजोगाईत एकमेव कोरोना चाचणी प्रयोगशाळा असल्याने याच ठिकाणी प्रचंड ताण येत आहे. जिल्ह्याच्या विविध भागातून दररोज किमान 2500 हून अधिक स्वॅब तपासणीसाठी या प्रयोगशाळेत पाठवले जातात. तिथे तीन शिफ्टमध्ये काम करुनही रुग्णांचे रिपोर्ट यायला किमान दोन दिवस लागत आहेत. त्यामुळे तातडीने आणखी एक प्रयोगशाळा कार्यान्वीत करणे जिल्हा प्रशासनासाठी महत्वाचे ठरणार आहे.
Leave a comment