परळी - गंगाखेड महामार्गासाठी २२४ कोटी,तर बीड शहरातुन जाणाऱ्या रस्त्यासाठी ५६ कोटी मंजूर
सीआरएफ अंतर्गत जिल्ह्यातील रस्त्यांसाठी मिळाले ७५ कोटी!
बीड । वार्ताहर
केंद्रीय महामार्ग विकास मंत्रालयाने बीड जिल्ह्यातील विविध रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला आहे. केंद्र सरकारने रस्ते विकासासाठी दिलेल्या निधीमुळे जिल्ह्यातील रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे.परळी-गंगाखेड मार्गासाठी दोनशे चोवीस कोटी रुपये,बीड शहरातून जाणाऱ्या महामार्गासाठी छप्पन कोटी रुपये तर केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत पंचाहत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आणि खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता,त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यानिमित्ताने मोठे यश आले आहे.
बीड शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे नूतनीकरण करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांमधून केली जात होती.शहरातील प्रमुख आणि वर्दळीच्या रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन रस्त्याच्या कामाचे तात्काळ अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.तसेच यासंदर्भात त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पाठपुरावा देखील केला होता. नितीन गडकरी यांनी मुंडे भगिनींच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देताना जिल्ह्यातील रस्त्यांसाठी आवश्यक निधी देण्याचे आश्वासन दिले होते.
पंकजाताई मुंडे यांनी पालकमंत्री असताना २८ फेब्रुवारी २०१८ रोजी परळी-गंगाखेड या ३६१ एफ राष्ट्रीय महामार्गासाठी निधी देण्याची मागणी नितीन गडकरी यांच्याकडे पत्र पाठवून केली होती.तसेच खा.प्रितमताई मुंडे यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला होता.पंकजाताई मुंडे यांनी केलेली मागणी आणि खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रभावी पाठपुराव्याची दखल घेऊन केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने बीड शहरातून जाणाऱ्या रस्त्यासाठी ५६ कोटी, जिल्ह्यातील अन्य रस्त्यांसाठी केंद्रीय मार्ग निधीतून ७५ कोटी आणि परळी - गंगाखेड महामार्गासाठी २२४ कोटी ४४ लाख निधी मंजूर केल्याची माहिती गडकरी यांनी ट्विट करून दिली. दरम्यान, यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांचे भाग्य उजळणार असून यानिमित्ताने पुन्हा एकदा मुंडे भगिनींच्या विकासाभिमुख नेतृत्वाची प्रचिती आली आहे.
Leave a comment