लोकशाही व्यवस्थेत भिन्न विचारसरणीचे दोन प्रवाह हे स्वाभाविकच असतात किंबहुना ते विचार प्रवाह सदृढ निकोप लोकशाहीसाठी आवशयक ही असतात,मात्र आज आपल्या महाराष्ट्रात ज्या दोन भिन्न विचारसरणीच्या राजकीय गटांकडून एकमेकांवर केली जाणारी आरोपांची धुळवड वा चिखलफेक ही अत्यंत  चिंताजनक वळणावर येऊन पोहचली आहे.महाराष्ट्राकडे देशातील एक सर्वश्रेष्ठ राज्य म्हणून कायमच बघितले जाते,महाराष्ट्रात राहणाऱ्या व महाराष्ट्र बाहेर असणाऱ्या नव्वद टक्के लोकांमध्ये महाराष्ट्राबद्दल राजकारणविरहित प्रेम व आपलेपणा आहे.महाराष्ट्र या राज्याला एका विशिष्ट उंची पर्यंत घेऊन जाण्यात अनेक भिन्न विचारसरणीच्या राजकीय नेत्यांनी आपले मोठे योगदान दिले आहे आपल्या स्वतःच्या कर्तृत्व व दुरदृष्टीच्या निर्णयाने महाराष्ट्र या राज्याला भारतात नंबर एक चे राज्य बनवण्यात या  नेत्यांनी व चांगल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मोठे प्रयत्न केले आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शासन व्यवस्था चालवताना रयतेप्रती घेतलेला समाजसेवेचा वसा पुढच्या आजपर्यंतच्या अनेक नेत्यांनी चालवला व त्यादृष्टीने राज्यातील प्रशासकीय यंत्रेनेलाही कामाला लावले महाराष्ट्रातील होऊन गेलेल्या प्रत्येक नेत्याची राजकीय विचारसरणी व त्यांचे पक्ष वेगवेगळे होते परंतु महाराष्ट्राचा विकास व राज्यातील सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदु मानून त्यांनी कामे केली म्हणूनच महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीत देशातील विविध प्रांतातील गोर गरीब मजूर येथे येऊन आपला उदरनिर्वाह भागवतात व सुरक्षित या महाराष्ट्रात राहतात.

शिक्षण,सहकार,बँकिंग,रोजगार हमी योजना,तंटामुक्ती गाव,ग्रामस्वच्छता अभियान,हरितक्रांती या सगळया यशस्वी योजना महाराष्ट्राने देशाला दिल्या या योजना राबविताना त्यावेळेचे तत्कालीन सरकार व प्रशासकीय यंत्रणेमध्ये मोठा समन्वय पाहायला मिळत असे.त्यावेळेचे मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी दुष्काळानंतरच्या कठीण परिस्थितीत  महाराष्ट्रात जे हरितक्रांती घडवून आणण्याचे स्वप्न पाहिले ते स्वप्न त्यांनी त्या काळच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जीवावरच पूर्णत्वास नेले.किल्लारी येथे झालेला मोठा भूकंप व त्यानंतरची तेथील परिस्थिती त्यावेळेचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी प्रशासकीय यंत्रणा बरोबर घेऊनच चांगल्या प्रकारे हाताळली पुढे सगळ्या जगाने त्यांचे कौतुक केले.अशा विविध वेळी आलेल्या संकटकाळी एकजुटीने काम करण्याची मोठी परंपरा महाराष्ट्रने देशासमोर कायमच ठेवली आहे,कार्यक्षम व चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची मोठी मांदियाळी या राज्याला लाभली आहे आजही महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना भारतात सर्वच ठिकाणी मान सन्मान मिळतो म्हणूनच देशातील विविध भागातून येणारे अधिकारी येथे काम करण्यास उत्सुक असतात म्हणूनच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी प्रत्येक विभागात चांगले अधिकारी काम करताना दिसून येतात.

मात्र गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात घडण्याऱ्या विविध घटनांत प्रशासकीय अधिकाऱ्यांचे वेगळेच रूप समोर येत आहे आत्ताच समोर आलेल्या वाझे, परमवीरसिंग,रश्मी शुक्ला प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या प्रशासकीय कर्तृत्वासमोरच मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.उद्योगपती मुकेश अंबानी च्या निवासस्थानासमोर जिलेटीन च्या कांड्यानी भरलेली स्कॉर्पिओ गाडी कोणी व का ठेवली?त्यामागे त्यांचा हेतू काय असेल?कोणाच्या सांगण्यावरून ठेवली? मनसुख हिरेन यांची हत्या का व कोणी केली?असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत या सर्व घटनांचा तपास ही चालू आहे पण तो तपास पूर्ण होईपर्यंतच सगळ्या राजकिय पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात केली.महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख एका टीव्ही कार्यक्रमात प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की मुंबई पोलीस आयुक्त परमजितसिंग यांनी हे प्रकरण चांगल्या पद्धतीने हाताळले नाही,त्यांच्याकडून गंभीर चुका झाल्या म्हणून त्यांची त्या पदावरून प्रशासकीय बदली दुसऱ्या ठिकाणी केली गेली.तर दुसऱ्याच दिवशी लगेच या परमजितसिंग या अधिकाऱ्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईत चाललेल्या बेकायदेशीर उद्योगाकडून महिना शंभर कोटी रुपयांची मागणी केली असा आरोप ठेवला व तशीच याचिका ही त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.महाराष्ट्राच्या इतिहासात अशी पहिलीच घटना असेल की एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सरकारच्या  एका मंत्र्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले त्यानंतर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजप च्या भूमिकेत अचानक बदल होऊन  आजपर्यंत त्यांच्या दृष्टीने असलेले अकार्यक्षम भ्रष्ट परमजितसिंग हे अधिकारी त्यांना इमानदार व सच्चे प्रामाणिक कर्तृत्ववान वाटू लागले.परंतु आज दुर्दैवाने नमूद करावेसे वाटते की या उज्वल महराष्ट्रातील हे चाललेले आजचे राजकारण आपला स्वार्थ साधण्यासाठी अधिकाऱ्यांना वापरात आहे तर अधिकारीही आपल्या स्वतःच्या हितासाठी राजकारण्यांचा वापर करत आहे,असे राजकारणी व अधिकारी यांचे लागेबांधे असणारी टोळीच आज महाराष्ट्रच्या मंत्रालयात दिसून येते,आपल्या मर्जीतील आधिकाऱ्यांना मंत्र्यांनी आपले शासकीय सचिव म्हणून ठेवायचे किंवा चांगल्या ठिकाणी त्यांना पोस्टिंग देऊन त्यांच्याकडून आपला स्वार्थ साधून घ्यायचा हे गेल्या अनेक वर्षात आलेल्या विविध सरकारे व त्यांच्या मंत्र्यांकडून त्या त्या विभागात  केल्याचे दिसून येते.राजकारणातील नेत्यांच्या वयक्तिक हेवेदाव्याचा अधिकारीं वर्ग मात्र स्वतःच्या फायद्यासाठी चांगलाच उपयोग करत आहेत.

मागील निवडणुकीत हातात आलेली सत्ता गेल्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्या उद्विग्न अवस्थेत सरकारवर आरोप करताना त्यांचा आततायीपणा समोर येत आहे,दिल्ली दरबारी भाजप मध्ये त्यांचे एक चांगला राजकारणी म्हणून मोठे वजन आहे परंतु सततच्या राजकीय आरोप करणे व त्या अनुषंगाने तोंडघशी पडल्यामुळे त्यांची पक्षात ही किंमत कमी होऊ लागल्याचे दिसून येते आहे.तसेच सत्ताधारी असलेल्या तीन पक्षाचे सरकार चालवण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी कसरत होताना पाहायला मिळत आहे एका बाजूला कोरोना महामारीचे संकट व हे तीन पक्षाचे सरकार टिकवण्यासाठी सरकार मधील अनेक चुकीच्या घडणाऱ्या गोष्टीकडे डोळेझाक करायची व त्याना पाठीशी घालण्याची सरकारची प्रवृत्ती दिसून येत आहे.वाझे,परमजितसिंग,शुक्ला वा त्याच्याशी निगडित असणाऱ्या इतर घटनांमुळे ना महाविकास आघाडी सरकारचे चांगले होईल ना विरोधी पक्ष भाजप चा विजय होईल मात्र अशा या सगळ्या प्रकरणांमुळे महाराष्ट्राची मान मात्र निश्चित खाली गेली आहे याचा मात्र या दोन्ही बाजूने विचार होणे गरजेचे आहे.

तसेच परवा दिपाली चव्हाण या वनक्षेत्र अधिकारी या सरकारी पदावर असलेल्या महिला अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली, भंडारा जिल्ह्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी शीतल फाळके यांनीही स्वतःला गळफास लावून आपलं जीवन संपवले अशा अकाली तरुण महिला अधिकाऱ्यांच्या जाण्याने सगळा महाराष्ट्र हळहळला परंतु निश्चितच स्वतःला पुरोगामी म्हणहुन घेणाऱ्या महाराष्ट्रासाठी हे भूषणावह नाही परत अशा महिला अधिकाऱ्यांच्या बाबतीत घटना होऊ नयेत म्हणून सरकारच्या वतीने ठोस पावलं उचलणे आवश्यक आहे.

 

 

प्रा.महेश कुंडलिक चौरे,

आष्टी.

मो.9423471324

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.