दुसर्यांदा लस घेण्याकडे अनेकांचे दुर्लक्ष
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात हेल्थ वर्कर दुसर्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर तर तिसर्या टप्प्यात 45 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या आणि काही आजार असलेल्या तसेच 60 वर्षावरील सर्वच व्यक्तींना लसीकरण सुरु करण्यात आले आहे. परंतू गत दोन दिवसापासून बीड, माजलगाव तसेच गेवराई उपजिल्हा रुग्णालयात लसीचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना ताटकळत बसावे लागले. दरम्यान बीड जिल्ह्यासाठी लातुर येथून कोरोना प्रतिबंधक लसीचे 16 हजार 170 डोस उपलब्ध होणार असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ.संजय कदम यांनी दिली. दरम्यान पहिल्यांदा कोरोना लस घेतलेल्यांपैकी अनेकांनी वेळेवर दुसरा डोस घेण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
बीड जिल्ह्यात 16 जानेवारी हेल्थ वर्कर यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु करण्यात आले त्यानंतर दुसर्या टप्प्यात फ्रंट लाईन वर्करला लसीकरण सुरु झाले. आता गत महिन्यापासून सर्वसामान्य नागरिक जे 45 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत आणि त्यांना काही आजार आहेत अशा तसेच 60 वर्षावरील सर्वच व्यक्तींना लस देण्यास सुरुवात झाली . बीड जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात तसेच ग्रामीण रुग्णालय आणि सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात ही लस उपलब्ध करून दिली आहे,त्याचसोबत परळी,बीड माजलगाव येथील काही रुग्णलायत देखील लस उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्ह्यासाठी आजपर्यंत 75 हजार डोस
बीड जिल्ह्यासाठी आजपर्यंत कोव्हीशिल्ड व कोव्हॅक्सीन या दोन्ही लशींचे मिळून 75 हजार 210 डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोव्हीशिल्ड लसीचे 55 हजार 440 डोस प्राप्त झाले आहेत. यापैकी 51 हजार 433 डोस देण्यात आले तर 3510 डोस शुक्रवारपर्यंत शिल्लक आहेत तसेच कोव्हॅक्सीन लसीचे 19 हजार 770 डोस जिल्ह्याला मिळाले होते. यातील 12 हजार 159 डोस देण्यात आले तर 6730 डोस शिल्लक आहेत.
असे झाले लसीकरण
आतापर्यंत जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 13 हजार 385 आरोग्य कर्मचार्यांना , 14 हजार 195 फ्रंटलाईन वर्करला, 24 हजार 783 जेष्ठ नागरिकांना तर 3 हजार 886 इतक्या 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. याशिवाय दुसर्या टप्प्यात 6155 आरोग्य कर्मचारी आणि 1205 फ्रंटलाईन वर्करला कोव्हीशिल्ड लस देण्यात आली आहे. दरम्यान पहिल्यांदा कोरोना लस घेतलेल्यांपैकी अनेकांनी वेळेवर दुसरा डोस घेतला नसल्याचे स्पष्ट होत आहे.
Leave a comment